चंद्रकांत खैरे उद्धव ठाकरेंच्या भेटीला! दानवेंसोबतच्या वादाबद्दल म्हणाले...

15 Apr 2025 15:47:07
 
Chandrakant Khaire
 
मुंबई : अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यातील पुन्हा उफाळून आलेल्या वादावर आता खुद्द खैरेंनी पडदा टाकला आहे. आधीच्या दिवशी अंबादास दानवेंवर प्रचंड आगपाखड करणाऱ्या चंद्रकांत खैरेंनी दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर युटर्न घेतला.
 
अंबादास दानवे यांनी बोलवलेल्या पक्षाच्या मेळाव्याला चंद्रकांत खैरेंनी दांडी मारली होती. त्यानंतर सोमवार, १४ एप्रिल रोजी याबाबत बोलताना चंद्रकांत खैरे यांनी दानवेंवर आगपाखड केली. "अंबादास दानवे यांनी मेळाव्याबाबत मला सांगितले नाही. मी उद्धव साहेबांना सांगणार आहे. अंबादास दानवे स्वत:ला खूप मोठे समजतात. आम्हाला तुम्ही कचरा समजता का? मी शिवसेना वाढवली. तुरुंगात गेलो, लाठ्या खाल्ल्या तुम्ही काय केले? मी आधी होतो नंतर हा आला आणि काड्या करण्याचे काम केले. मला कुणी काढू शकत नाही कारण मी बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक आहे," असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला.
 
हे वाचलंत का? -  कैद्याच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी...; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्वपूर्ण निर्णय कोणते?
 
त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी खैरेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, "आमच्यातील वाद केव्हाच निवळला. वाद कुठे होता. आता सगळं ओके झालं आहे. मी आता शिवसेना भवनमध्ये असलेल्या नेत्यांच्या बैठकीला चाललोय. अंबादास दानवे माझ्यापेक्षा लहान आहे. आम्ही गळाभेट घेतच असतो. संपूर्ण विदर्भाचा माझ्या समाजाचा मेळावा होता. तिथे मी गेलो होतो. दोन महिन्यांपूर्वीच याबाबत ठरलं होतं. तोपर्यंत अंबादास दानवे यांनी इकडे मेळावा घेतला. पण यापुढे आम्ही दोघे मिळून कार्यक्रम करणार आहोत. एकटा तो आणि एकटा मी असे नाही. दोघेही एकत्र बसून कार्यक्रम करू," असे ते म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0