ठाणे: ( Case against mangrove forest destroyer ) दिवा पश्चिमेकडील देसाई खाडीपट्ट्यात भूमाफियांनी बेकायदा खारफुटींची कत्तल करून भराव केल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला. त्यानुसार ग्राम महसूल अधिकारी, दिवा यांनी मुंब्रा मंडळ अधिकारी यांच्या समवेत मौजे दिवा येथील उग्रेश्वर मंदिराजवळ गणेश घाट या खाडीलगत भागाची समक्ष स्थळ पाहणी केली होती.
दिवा खाडीत पाहणी प्रसंगी, खाडीलगतच्या या जमिनीत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात मातीचा भराव केल्याचे निदर्शनास आले होते. याविषयी स्थानिकांकडे चौकशी केली असता हा भराव प्रदीप पाटील नामक व्यक्ती करीत असल्याचे समजले. तेथील समक्ष स्थळ पाहणी करून पाटील या व्यक्ती विरोधात कांदळवनाचा र्हास केल्याबाबत ‘पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986’चे ‘कलम 15’ व ‘17’ अन्वये शासनाच्यावतीने मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी उर्मिला पाटील व तहसीलदार उमेश पाटील यांनी दिली.
कांदळवन बफरझोन क्षेत्रात अवैध वृक्षतोड; विकासकाविरुद्ध गुन्हा
‘सिडको’च्या मालकीची नेरुळ, सीवुड्स प्लॉट नं. 3, 6, 7 सेक्टर 52 ए येथील जागा भूखंड वाटपाद्वारे मेयर्स टूडे रॉयल डेव्हलपर्स यांना देण्यात आली होती. या जागी त्यांच्यामार्फत जेसीबीच्या साहाय्याने विविध प्रकारची 100 झाडे मुळासकट तोडण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. ही झाडे तोडण्याकरिता ‘सिडको’कडून कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नव्हती.
या अवैध वृक्षतोडी विरोधात नवी मुंबई महापालिकेमार्फत कारवाई करून दोन जेसीबी ताब्यात घेत दंड ठोठावला. कांदळवन बफरझोन क्षेत्रामध्ये वृक्षतोड केल्याप्रकरणी संबंधित विकासक/ठेकेदार यांच्याविरुद्ध ‘एनआरआय सागरी पोलीस ठाणे’ येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.