लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी ५०० रुपये! राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांचे स्पष्टीकरण, म्हणाले...
15-Apr-2025
Total Views |
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या आठ लाख लाभार्थी महिलांना आता १५०० रुपयांऐवजी ५०० रुपये मिळणार आहे. दरम्यान, राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.
राज्यमंत्री आशिष जैस्वाल म्हणाले की, "सरकारने लाडकी बहिण योजनेच्या कुठल्याही अटी बदलल्या नाही. ही योजना गरीब महिलांसाठी आहे. परंतू, काही श्रीमंत घरांतील लोकांनी हा लाभ घेतला असला तरीही सरकारने कुठल्याही लाडक्या बहिणींकडून वसूली केली नाही. उलट ज्या लाभार्थ्यांना ही गोष्ट लक्षात आली ते स्वत:हून या योजनेपासून हळूहळू माघार घेत आहे."
"सरकारने कुठल्याही महिलांवर गुन्हा दाखल केला नाही. कुणाकडूनही वसूली केली नाही. तरीसुद्धा विरोधक हा खोटा भ्रम पसरवत आहेत. ज्यादिवशी शासन निर्णयात सुधारणा किंवा बदल होतील त्यावेळी ती बाब वेबसाईवर येईल," अशी टीकाही आशिष जैस्वाल यांनी विरोधकांवर केली आहे.
ते पुढे म्हणाले की, "दरवर्षी सरकारच्या महसूली जमेमध्ये वाढ होते. असते. जेव्हा सरकारचे उत्पन्न वाढते तेव्हा वेगवेगळ्या विभागांना तरतूद वाढवून दिली जाते. त्यानुसार सरकारच्या महसूली जमामध्ये वाढ झाल्यानंतर नमो शेतकरी, संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहिण योजना या सर्व योजनांच्या लाभार्थ्यांना टप्याटप्याने निवडणुकीपूर्वी दिलेली वचने पूर्ण करण्याचा सरकार प्रयत्न करेल," असेही त्यांनी सांगितले.