नवी दिल्ली : (Murshidabad Violence) पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात वक्फ सुधारणा कायद्यावरुन सुरु झालेल्या हिंसाचारात पोलिसांनी आतापर्यंत दीडशे जणांना अटक केली आहे. दंगलग्रस्त भागांत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांच्या मदतीसाठी सीमा सुरक्षा दलाची (बीएसएफ) पाच पथके तैनात करण्यात आली होती. या बीएसएफच्या जवानांवर दंगलखोरांनी पेट्रोल बॉम्ब आणि दगडफेक केल्याची माहिती बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी दिली.
"परिस्थिती तणावपूर्ण परंतु नियंत्रणात आहे"
बीएसएफचे डीआयजी आणि पीआरओ (दक्षिण बंगाल फ्रंटियर) निलोत्पल कुमार पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुर्शिदाबादमधील परिस्थिती तणावपूर्ण पण नियंत्रणात आली आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "काल परिस्थिती गंभीर झाली. मुर्शिदाबादच्या समसेरगंज भागात असे काही भाग होते जिथे आमच्या पथकांवर पेट्रोल बॉम्ब आणि दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात आमचे कोणतेही सैनिक गंभीर जखमी झाले नाहीत. मात्र, मोठ्या प्रमाणावर केलेल्या दगडफेकीत किरकोळ जखमा आणि दुखापत होणे सामान्य बाब आहे. हे दगडफेक करणारी लोकं तेच आहेत ज्यांनी इथे हिंसाचाराला सुरुवात केली होती. आणि याचदरम्यान हिंसाचार नियंत्रणात आणण्याच अपयशी ठरलेले टीएमसी सरकार या सगळ्यात बीएसएफला दोषी ठरवत आहे.
मुर्शिदाबादमधील धुलियन भागातील लोकांनी भागीरथी नदी पार करून माल्दाजवळील भागात आश्रय घेतला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. धुलियन भागातून ४०० जणांनी घर सोडल्याचा दावा विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी यांनी केला आहे. देवनापूर-सोवापूर ग्रामपंचायतीच्या सुलेखा चौधरी यांनी सांगितले की, शनिवारी रात्रीपर्यंत ५०० हून अधिक लोक या ठिकाणी आले होते. त्यात महिलांची संख्या जास्त होती. स्थानिक प्रशासनाने त्यांच्या राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था केली आहे. शाळांमध्ये त्यांना आश्रय दिला आहे.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\