संजय राऊत यांचे बोलणे कोत्या मनोवृत्तीचे

- भाजप गटनेते आ. प्रविण दरेकरांचा पलटवार

    14-Apr-2025
Total Views |

( pravin darekar on sanjnay raut ) 
 
मुंबई: ( pravin darekar on sanjnay raut ) उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात वक्तव्य केले होते. राऊत यांच्या या वक्तव्यावर भाजप गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी पलटवार केला आहे. “संजय राऊत यांचे बोलणे कोत्या मनोवृत्तीचे असून रोज उठल्याबरोबर त्यांचा भोंगा वाजलाच पाहिजे. अशा प्रकारचा विषय घेऊन भावना भडकविता येतात का?” असा केविलवाणा प्रयत्न त्यांचा असल्याची टीकाही दरेकरांनी केली आहे.
 
माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, “केंद्रीय मंत्री महाराष्ट्रात येऊन शिवरायांना केवळ अभिवादन करत नाहीत, तर श्रद्धेने एकरूप होतात. महाराजांचा विचार देशपातळीवर नव्हे, तर जागतिक स्तरावर जाऊन त्याचे उदात्तीकरण झाले पाहिजे, अशी भूमिका जेव्हा घेतात, त्यावेळी त्याकडे सकारात्मक पद्धतीने बघितले पाहिजे. दुर्दैवाने संजय राऊत यांची दृष्टीच भ्रष्ट झाली आहे,” असा टोलाही दरेकरांनी लगावला.
 
तसेच, दरेकर पुढे म्हणाले की, “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रात येऊन शिवरायांचे विचार वैश्विक स्तरावर कसे नेता येतील, या दृष्टीने सूतोवाच केले. उदात्तीकरणासाठी केंद्र सरकारकडून जे जे लागेल ते करू. उदयनराजे यांनी ज्या मागण्या केल्या, त्यालाही सकारात्मक प्रतिसाद दिला. महाराजांचे वंशज सहभागी असतील, तर बाकीच्यांनी राजकारण करण्याची गरज नाही,” असेही दरेकरांनी म्हणाले.
 
निधी वाटपावरून मतभेद असल्याच्या चर्चेवर दरेकर म्हणाले की, “महायुतीत सर्व गोष्टी समन्वयातून सुरू आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत. तिन्ही पक्षाचे नेते उत्तम समन्वय साधत, सर्वांना बरोबर घेऊन सर्वांना न्याय द्यायचा त्यांचा प्रयत्न आहे. एकनाथ शिंदे यांच्या मनात काही असेल, तर आमच्या नेतृत्वाशी बोलू शकतात. आमच्यात काही वाद, वितुष्ट असे काही चित्र नाही. राज्यातील जनतेने सर्वसामान्यांच्या भल्यासाठी, राज्याच्या हितासाठी महायुतीला जनाधार दिला आहे, याचे भान सर्वांना आहे.”
 
पाणी प्रश्नावरून उबाठा गटाने दिलेल्या इशार्‍यावर बोलताना दरेकर म्हणाले की, “पाण्याला आग लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. 25 वर्षे सत्तेत असताना मुंबईकरांच्या पाण्याच्या प्रश्नावर काय केले? त्याचा लेखाजोखा आधी मांडा. आता टँकर चालकांनी संप केल्यावर तुम्ही काय हस्तक्षेप केला ते सांगा. उलटपक्षी अ‍ॅड. आशिष शेलारांनी यात हस्तक्षेप केला. केंद्रीय जलशक्तीमंत्री सी. आर. पाटील यांच्याकडे मी संपकर्‍यांचे शिष्टमंडळ घेऊन गेलो. त्या बैठकीत त्यांच्या मागण्या मान्यही केल्या.
 
परंतु, आता राजकीयदृष्ट्या मुंबईकरांच्या जीवाशी कुणीतरी खेळण्याचा प्रयत्न करतो. पाणी ही अत्यावश्यक सेवा आहे. कुणीही यावर राजकारण करू नये. मुंबईकरांच्या जीवन मरणाचा पाणी हा प्रश्न आहे. पाणी ही अत्यावश्यक गोष्ट आहे. सरकार त्यांना सांगून बघेल. नाहीतर अत्यावश्यक सेवेखाली जनहितासाठी कठोर कारवाई करावी लागली, तरी सरकार मागेपुढे पाहणार नाही.”
 
संभाजीराजे, शाहू महाराजांचाही गादीचे वारसदार म्हणून आदर
 
संभाजीराजे, शाहू महाराज यांना कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्याच्या चर्चावर बोलताना दरेकर म्हणाले की, “या कार्यक्रमाचे आयोजक स्मारक मंडळ आहे. त्यांनी कुणाला बोलावले, नाही बोलावले, याची मला कल्पना नाही. संभाजीराजे छत्रपती यांनाही बोलावले असेल. ते का आले नाहीत, याची माहिती नाही. परंतु, ते आले नाही म्हणून त्यांच्याविषयी श्रद्धा कमी आहे, असे काही मानायचे कारण नाही. संभाजीराजे, शाहू महाराज यांचाही गादीचे वारसदार म्हणून आदर, सन्मान आहे.”