चंदीगड : (PM Narendra Modi On Congress) पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. १४ एप्रिल रोजी हरियाणा दौऱ्यावर आहेत. सकाळी दहा वाजता त्यांनी हिसारमधील हरियाणाच्या पहिल्या विमानतळाचे उद्घाटन केले. यानंतर त्यांनी विमानतळावरच जाहीर सभेला संबोधित केले. दरम्यान, वक्फ सुधारणा विधेयकाला काँग्रेसच्या विरोध करण्यावरुन "काँग्रेस त्यांच्या पक्षाचा अध्यक्ष मुस्लिम व्यक्ती का करत नाही?" असा खोचक सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला.
"काँग्रेस त्यांच्या पक्षाचा अध्यक्ष मुस्लिम व्यक्ती का करत नाही?"
हरियाणामधील एका सभेत बोलत असताना यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, "काँग्रेसने फक्त मुस्लिम कट्टरपंथीयांचे तुष्टीकरण केले. नवीन कायद्याला त्यांचा होणार विरोध हेच सिद्ध करतो. काँग्रेस म्हणते की हे मुस्लिमांच्या हितासाठी केले गेले. मी विचारू इच्छितो की जर काँग्रेस पक्षाला मनापासून मुस्लिमांबद्दल थोडीशीही सहानुभूती असेल तर त्यांच्या पक्षाचा अध्यक्ष मुस्लिम व्यक्तीला का करत नाही? तसेच काँग्रेस निवडणुकीत ५० टक्के तिकिटे मुस्लिम उमेदवारांसाठी का राखीव ठेवत नाही? परंतु त्यांचे नेते असे काहीही करणार नाहीत. त्यांना फक्त देशातील नागरिकांचे हक्क हिरावून घ्यायचे आहेत."
"काँग्रेसचे लोक समान नागरी कायद्याला विरोध करत आहेत"
पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले, "काँग्रेसने आपल्या पवित्र संविधानाला सत्ता मिळवण्यासाठी एक साधन बनवले आहे. जेव्हा जेव्हा काँग्रेसवर सत्तेचे संकट आले तेव्हा त्यांनी संविधान चिरडण्याचा प्रयत्न केला. संविधानाचा आत्मा असा आहे की प्रत्येकासाठी समान नागरी संहिता असावी, ज्याला मी समान नागरी संहिता (UCC) म्हणतो, परंतु काँग्रेसने तो लागू केला नाही. उत्तराखंडमध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर समान नागरी संहिता लागू करण्यात आला. परंतु दुर्देवाने काँग्रेस नेते यालाही विरोध करत आहेत." अशी टीका त्यांनी केली.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\