मुंबई : मानवी मन हे एक अलौकिक अस्तित्व आहे. त्याचे लौकिक जीवनाशी असलेले नाते अनेकदा इतके गूढ असते की त्याची व्याप्ती आपणास खोलवर जाणवते. माणसाचे मन हे प्रत्येक नात्याच्या, प्रत्येक भावनिक क्षणाच्या केंद्रस्थानी असते. नात्यांमध्ये जे परस्पर आकर्षण किंवा दुरावा निर्माण होतो, तो प्रत्यक्षात मनाच्या स्थितीवर आणि त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. हेच गूढ आणि गुंफण व्यक्त करतोय निर्झरा एंटरटेनमेंट प्रस्तुत 'नाते मनाचे' हा चित्रपट.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या हस्ते नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना राजे भोसले यांनी या चित्रपटाची कलात्मक बाजू, कलाकारांचे योगदान आणि विषयाच्या सखोलतेचं विशेष कौतुक केलं. "हा चित्रपट प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीने अनुभवावा," असे आवाहन त्यांनी उपस्थित पत्रकार परिषदेत केले.
दिग्दर्शक संजय गायकवाड यांनी सांगितले की, ''नात्यांमधील उबग, अंतर, गोंधळ आणि गुंता हे सर्व अनुभव घेताना माणसाचे मन हरवत जाते. हेच हरवलेपण आणि त्यातील भावनिक प्रवास आम्ही या चित्रपटात मांडला आहे. जुन्या-नव्या कलाकारांनी आपल्या भूमिका मनापासून साकारल्या आहेत.'' या चित्रपटाला गायनाचीही सशक्त साथ लाभली असून वैशाली सामंत, सुरेश वाडकर, आनंदी जोशी आणि ऋषिकेश रानडे यांसारख्या सुप्रसिद्ध गायकांचे स्वर या चित्रपटाला लाभले आहेत.
या चित्रपटात सुरजची प्रमुख भूमिका साकारणारे अभिनेते दिनेश काळे यांनी आपल्या भूमिकेबद्दल सांगताना म्हटले की, ''ही भूमिका अत्यंत भावनिक आणि आव्हानात्मक होती. प्रत्येक प्रसंगानुसार बदलणारी देहबोली, चेहरा आणि मनाची प्रतिक्रिया हे सर्व समजून घेऊन अभिनय करणे हे माझ्यासाठी एक अभ्यासच होते. ‘नाते मनाचे’ हा चित्रपट म्हणजे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या नात्यांमधून वाहणाऱ्या भावनांचा आरसा आहे.''
या चित्रपटात सुरजच्या मैत्रिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री फाल्गुनी झेंडे हिने देखील आपल्या अनुभवाबद्दल सांगताना, ''ही भूमिका करताना खूप मजा आली. सगळ्यांनी मनापासून काम केले आहे आणि ते पडद्यावर नक्कीच जाणवेल,'' असे मत व्यक्त केले. या चित्रपटाचे डिजिटल मीडिया पार्टनर 'मुंबई तरुण भारत' असणार आहे. 'नाते मनाचे' हा चित्रपट म्हणजे नात्यांच्या विणीतील संवेदनशील प्रवास, भावनांची गुंफण, आणि माणसाच्या मनाच्या अद्भुत विश्वाचा अनुभव आहे. लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाकडे रसिक प्रेक्षक नक्कीच उत्सुकतेने पाहतील, यात शंका नाही.