पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला अटक, CBI च्या विनंतीवरून बे‌ल्जियम पोलिसांची कारवाई!

14 Apr 2025 10:17:21
 
mehul choksi arrested in belgium in pnb fraud case
 
मुंबई : (Mehul Choksi Arrested) पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी फरार असलेला आरोपी मेहुल चोक्सी याला बे‌ल्जियम पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. सीबीआयच्या विनंतीवरून शनिवारी १२ एप्रिलला बेल्जियममध्ये त्याला अटक करण्यात आली आहे. हिऱ्यांचा व्यापारी असणारा मेहुल चोक्सी कोट्यवधींचा कर्ज घोटाळा करुन तो पळाला होता. पंजाब नॅशनल बँकेत१३ हजार ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदीवर आहे.
 
सीबीआयने बेल्जियमच्या अधिकाऱ्यांना औपचारिक पत्र लिहून चौकसीला अटक करण्याची मागणी केली होती. मेहुल चोक्सी याच्याविरुद्ध २३ मे २०१८ आणि १५ जून २०२१ रोजी मुंबई न्यायालयाने वॉरंट जारी केले होते. या आधारावर बेल्जियम पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मेहुल चोक्सीवर नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्याच्या कायद्यानुसार फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केल्यास चोक्सीच्या जप्त केलेल्या साऱ्या संपत्तीवर जप्ती आणण्याची प्रक्रिया तपासयंत्रणेने सुरू केली आहे. जेणेकरून त्याची आर्थिक कोंडी करणे शक्य होईल. मात्र, मेहुल चोक्सीनं आरोग्याचे कारण देऊन तूर्तास भारतात परतण्यास शक्य नसल्याचे त्याच्या याचिकेत म्हटले होते. त्यामुळे, मेहुल चोक्सीची भारतात येण्याची प्रक्रिया आणखी काही काळासाठी लांबणीवर गेल्याची माहिती फेब्रुवारी महिन्यात समोर आली होती.
 
दरम्यान, मेहुल चोक्सीचा पासपोर्ट भारत सरकारकडून रद्द करण्यात आला आहे. पीएमएलए न्यायालयात चोक्सीच्या पासपोर्टच्या निलंबनासंदर्भातील कागदपत्रे आणि त्याच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) प्रकरणाच्या तपास फाईल्स मागवण्याचे निर्देशही यापूर्वी देण्यात आले होते. बे‌ल्जियम पोलिसांनी मेहुल चोक्सीला अटक केल्याने आता त्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाल्याच्या चर्चा सुरु आहेत. दहशतवादी तहव्वूर राणा याचे भारतात प्रत्यार्पण यशस्वी झाल्यानंतर, मेहुल चोक्सीची अटक ही केंद्राचे मोठे यश मानले जात आहे. जर यंत्रणांना चोक्सीला भारतात आणण्यात यश आले तर ते पीएनबी घोटाळ्याच्या तपासातील एक महत्त्वाचे पाऊल ठरु शकेल.
 
 
Powered By Sangraha 9.0