मुंबई : संजय राऊत यांचे नाव खरंतर संजय तेढकर असायला हवं, असा घणाघात भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी केला आहे. सामना वृत्तपत्रात आलेल्या अग्रलेखावर त्यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत प्रत्युत्तर दिले.
रवींद्र चव्हाण म्हणाले की, "समाजा समाजात तेढ निर्माण करून सामन्याची मजा घेणाऱ्या संपादकाने फुले विरुद्ध फडणवीस हा अग्रलेख समाज प्रबोधनासाठी नव्हे तर समाज विघटनासाठी लिहिला आहे. त्यांचे नाव खरंतर संजय तेढकर असायला हवे. आपल्या लेखणीतून, वक्तव्यातून आणि कृतीतुन सतत समाजा-समाजात तेढ निर्माण करणे एवढेच या संपादक महाशयांनी केले आहे आणि तेवढेच त्यांना येते," अशी टीका त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, "देवेंद्रजी महाराष्ट्राचे नेते आहेत. अंत्योदय आणि मानवतेची विचारधारा रुजविणाऱ्या शामाप्रसाद मुखर्जी आणि दीनदयाळ उपाध्यायजींना आदर्श मानणारे नेते आहेत, हे अवघ्या महाराष्ट्राची जनता जाणते. त्यामुळे अहो तेढकर, सावित्रीमाईंच्या शब्दात सांगायचे झाले तर मानवाचे नाते, ओळखती जे ते, सावित्री वदते ते संत. सावित्रीमाईंचे काव्यफुले मधलेच हे शब्द आहेत आणि तीच आमची विचारधाराही," असेही रवींद्र चव्हाण म्हणाले.