भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती देशभरात साजरी होत असताना, मुंबईतील एल्फिन्स्टन विभागातील ‘समता क्रीडा मंडळ’ या सामाजिक संस्थेने यावर्षीही आपल्या परंपरेला साजेसे आयोजन करत, बाबासाहेबांच्या विचारांचा जागर केला. ‘बाबासाहेबांना डोक्यावर न घेता, त्यांच्या विचारांना डोक्यात घ्या,’ हा प्रभावी संदेश यावर्षीच्या कार्यक्रमांतून पुन्हा एकदा ठळकपणे समोर आला.
या संस्थेची स्थापना 1981 मध्ये झाली. ही संस्था गेली 44 वर्षे सातत्याने समानता, बंधुता, न्याय आणि जनजागृतीसाठी कार्यरत आहे. हे मंडळ केवळ क्रीडासंस्थाच न राहता, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळीचे प्रभावी माध्यम ठरले आहे. मंडळाच्या उपक्रमांची व्याप्ती ही समाजपरिवर्तनासाठीच्या एका चळवळीसारखी आहे.
दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, एक सामाजिक आणि वैचारिक चळवळ म्हणून संस्थेकडून साजरी होतेे. यावर्षीही संस्थेने सामाजिक उपक्रमांवर भर देत, अनेक उत्तम कार्यक्रम राबवले. महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, शिक्षणातील सर्वसमावेशकता आणि भारतीय संविधानातील मूलभूत मूल्यांची जनजागृती या विषयांवरील चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले. बाबासाहेबांचे विचार समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचवणे हाच यामागचा विचार! यावेळी डॉ. बाबासाहेबांच्या विचारांवर मंडळाकडून प्रत्यक्ष कृती करण्यात आली.
‘समता क्रीडा मंडळा’च्या कार्याची दखल शासनाकडूनही घेण्यात आली. 1990 मध्येच महाराष्ट्र शासनाकडून ‘उत्कृष्ट मंडळ’ सन्मानाने या संस्थेला गौरविण्यात आले. संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष विजय लोंडे यांच्या नेतृत्वात, हा मान मिळाला होता.
मंडळाची कार्यपद्धती म्हणजे, बाबासाहेबांच्या विचारांचा वास्तवाशी संवादी प्रवास आहे. समाजातील उपेक्षित घटकांसाठी मंडळाने आयोजित केलेले विविध उपक्रम हे सर्व बाबासाहेबांच्या ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या घोषवाक्याचे मूर्त स्वरूपच!
डॉ. आंबेडकर जयंतीच्या दिवशी विशेष व्याख्यानात संविधानाचे महत्त्व, त्यातील मूलभूत हक्क आणि कर्तव्यांबाबत नागरिकांना सजग केले गेले. मुलांकरिता रेखाचित्र स्पर्धा, युवकांसाठी निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांच्या माध्यमातून, बाबासाहेबांच्या जीवनकार्याची उजळणी करण्यात आली. यामध्ये अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
केवळ घोषणांचा गजर न करता, कृतीच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारांना मूर्त रूप द्यावे, जयंती म्हणजे केवळ मिरवणूक, ढोल-ताशांचा गजरातील मिरवणुका नसून, तर ती एक शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि आत्मपरीक्षण करण्याची संधी असल्याचे,या संस्थेने आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. बाबासाहेबांचे विचार हे आजही लागू पडतात. त्यांच्या विचारांवर वाटचाल करत हे मंडळ, आजच्या पिढीसाठी एक प्रेरणास्थान ठरले आहे.
आज जेव्हा सामाजिक भेद, विषमता वाढताना दिसते, तेव्हा अशा संस्था समाजपरिवर्तनाचा प्रकाशस्तंभ ठरतात. ‘समता क्रीडा मंडळा’ने 134व्या जयंतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध केले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका वर्गाचे नव्हे, तर सर्वसामान्यांच्या न्याय, हक्क आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहेत.
‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ही केवळ घोषणा नाही, तर एक जीवनशैली
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपण दरवर्षी अभिवादन करतो, पण त्यांचा विचार समाजाच्या प्रत्येक कानाकोपर्यात पोहोचवणे, हाच त्यांचा खरा सन्मान ठरेल. बाबासाहेब हे केवळ एका समाजाचे नव्हते, ते संपूर्ण मानवतेचे उद्धारक होते. त्यांनी दिलेले संविधान हा केवळ कायद्याचा दस्तऐवज नाही, तर तो समानतेचा, स्वाभिमानाचा आणि समतेच्या लढ्याचा जिवंत पुरावा आहे. भीमजयंतीच्या निमित्ताने मी तमाम भारतीयांना हेच आवाहन करतो, बाबासाहेबांना एका जातीच्या चौकटीत पाहू नका. त्यांच्या विचारांना कृतीत आणा. समतेसाठी आवाज उठवा. शिक्षण घ्या. संघटित व्हा आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करा. कारण, बाबासाहेबांचे कार्य फक्त गौरव करण्यासाठी नव्हे, तर आचरणात आणण्यासाठी आहे. जय भीम!
प्रशांत कांबळे, अध्यक्ष, समता क्रीडा मंडळ
- सागर देवरे