मुंबई : यापुढे तनिषा भिसे प्रकरण घडू नये यासाठी कायदेशीर कारवाई करणार आहे, अशी ग्वाही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली. त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला.
रुपाली चाकणकर म्हणाल्या की, "भिसे कुटुंबियांनी अलंकार पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. आता ससून रुग्णालयाचा अहवाल येणे बाकी आहे. उद्या हा अहवाल येईल आणि सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन त्यावर चर्चा करू. माता मृत्यू अन्वेशन समिती आणि धर्मादाय आयुक्त समितीचा अहवाल मंत्रालयात सादर करण्यात आला आहे. उद्या ससून रुग्णालयाचा अहवाल येईल. त्यानंतर पुढील कारवाईसंबंधी भूमिका मांडली जाईल. राज्य महिला आयोग सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे. यात जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई जाईल. यापुढे कोणतीही तनिषा भिसे घडू नये ही जबाबदारी आम्ही घेणार आहोत," असे त्या म्हणाल्या.
"दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे धर्मादाय रुग्णालय आहे, त्यामुळे याप्रकरणात धर्मादाय अहवाल असणे आवश्यक आहे. तनिषा भिसे यांनी ज्या रुग्णालयांमध्ये उपचार घेतले तिथला अहवाल येणे गरजेचे आहे. या अहवालांच्या माध्यमातून कायदेशीर कारवाई करण्यात येईल," असेही रुपाली चाकणकर यांनी सांगितले.