स्वार्थ आणि भेदांना तिलांजली वाहण्याचे काम डॉ. हेडगेवार व डॉ. आंबेडकर दोघांनी केले

- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन

    14-Apr-2025
Total Views |
 
RSS chief Dr. Mohan Bhagwat on ambedkar jayanti
 
मुंबई : ( RSS chief  Dr. Mohan Bhagwat on ambedkar jayanti ) "आद्य सरसंघचालक प.पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर दोघांचेही कार्य सामाजिकदृष्ट्या समानच आहे. समाजात स्वार्थ आणि भेदांना तिलांजली वाहण्याचे काम दोघांनीही केले", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
 
कानपुर येथे नव्याने बांधण्यात आलेले श्री केशव स्मृति समिती निर्मित 'केशव भवन कार्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहा'चा प्रवेशोत्सव सोहळा दि. १४ एप्रिल रोजी संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधत सरसंघचालक म्हणाले, "स्वातंत्र्य, समता एकत्रित आणायचे असेल तर बंधुभाव असणेही आवश्यक आहे. बंधुभाव हाच धर्म आहे. भारत धर्मप्राण देश आहे.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर या धर्मतत्वाचे पक्के पुरस्कर्ते आहेत. समाजातील विषमतेला मुळापासून उखाडण्याचे कार्य बाबासाहेबांनी केले. यासाठी त्यांनी आपले सारे जीवन समर्पित केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. हेडगेवार यांचे कार्य एक असले तरी सुरुवात मात्र वेगवेगळ्या दिशेने आणि वेगवेगळ्या परिस्थितीत झाली. दोघांनी समाजात अपार आत्मियता भरली. हीच आत्मियता तयार करून पुढे स्वार्थ आणि भेदांना तिलांजली वाहण्याचे कार्य दोघांनीही केले."
 
पुढे ते म्हणाले, "भारत ही हिंदूंची मायभूमी आहे. भारत प्रतिष्ठित आणि सुरक्षित झाला तर जगभरातील हिंदू सुरक्षित राहतील. हिंदू समाजाला संघटित करण्याचे काम जगात सुरू आहे. भारतात हे काम संघ करत आहे. भारताला एक मजबूत, आत्मनिर्भर आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध राष्ट्र बनवण्याचा आमचा उद्देश आहे. संघाचे कार्य कोणत्याही एका जातीचे, धर्माचे किंवा समूहाचे नसून संपूर्ण समाजाचे आहे."