मुंबई: ( MHADA CEO Sanjeev Jaiswal ) “मुंबईत जमिनीची उपलब्धता कायमस्वरूपी आव्हान आहे. म्हाडाला रखडलेले प्रकल्प ताब्यात घेण्यास सक्षम बनवणार्या कलम ९१ अ मध्ये अलिकडेच सुधारणा करण्यात आली. सेस बिल्डिंग पुनर्विकासात दीर्घकाळ अडथळा असलेल्या जमीन मालकांना भरपाई देण्याचे काम आता कलम७९ अ अंतर्गत न्याय्य तरतुदींसह केले जात आहे. पुनर्विकास म्हणजे केवळ नवीन इमारती बांधण्याबद्दल नाही तर व्यवहार्यता, पारदर्शकता आणि वेळेवर वितरण करणे ही यात अध्याहृत आहे. यातील भाडेकरूंचे हक्क आणि प्रकल्प व्यवहार्यता दोन्ही सुरक्षित करण्यासाठी स्पष्ट एफएसआय फ्रेमवर्क आणि प्रामाणिक संवाद महत्त्वाचा आहे,“ असे प्रतिपादन म्हाडाचे उपाध्यक्ष आणि सीईओ संजीव जयस्वाल यांनी केले.
क्रेडाई-एमसीएचआयची सुलभ पुनर्विकासाबाबत झालेल्या परिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी यांनी मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासात मजबूत सार्वजनिक-खाजगी भागीदारीची आवश्यकता अधोरेखित केली.
ही परिषद जबाबदार आणि भविष्यासाठी सज्ज शहरी नूतनीकरणाच्या दिशेने मुंबईच्या प्रवासात एक मैलाचा दगड ठरली. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित एकदिवसीय मेगा प्रदर्शनात ४० हून अधिक आघाडीचे विकासक आणि ३००० हून अधिक गृहनिर्माण संस्था, कायदेशीर क्षेत्रातील दिग्गज, शहरी नियोजक, वास्तुविशारद आणि धोरणकर्ते एकत्र आले होते.
या कार्यक्रमात सहभागी झालेल्या गृहनिर्माण संस्थांनी विकासक आणि सल्लागारांशी थेट सल्लामसलत केली. कायदेशीर सल्ला आणि आर्थिक नियोजनापासून ते धोरणे आणि अंमलबजावणी मॉडेल डिझाइन करण्यापर्यंत, संस्थांना स्पष्टता आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी समग्र मार्गदर्शन मिळाले.
क्रेडाई नॅशनलचे अध्यक्ष आणि रुस्तमजी ग्रुपचे सीएमडी बोमन इराणी यांनी विश्वास आणि योग्य परिश्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, “सर्वोच्च ऑफर आणि सर्वोत्तम ऑफरमध्ये खूप फरक आहे. सोसायटींनी संख्येच्या पलीकडे पाहिले पाहिजे. विकासकाच्या हेतूवर, ट्रॅक रेकॉर्डवर आणि आर्थिक ताकदीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. पुनर्विकास हा एक सहयोगी प्रवास आहे. एकदा तुमची समिती आणि सल्लागार नियुक्त झाले की त्यांच्यावर विश्वास ठेवा. पारदर्शक पीएमसी आणि सक्षम कायदेशीर सल्लागार निवडा. परंतु अति सावधगिरी बाळगून प्रगती थांबवू नका. हे एक मोठ्या जोखमीचे क्षेत्र आहे. केवळ भागीदारी आणि खुला संवादच तुमच्या स्वप्नातील घराला वास्तवात बदलू शकतो.
क्रेडाई-एमसीएचआयचे अध्यक्ष आणि रोमेल ग्रुपचे संचालक डोमनिक रोमेल यांनी नमूद केले की, “पुनर्विकास हा गरजेमुळे होतो, लोभामुळे नाही. आपण अवास्तव अपेक्षा आणि कालबाह्य नियमांपासून दूर जाऊया. पुनर्विकासात रहिवाशांच्या सर्वोत्तम हितासाठी काम झाले पाहिजे.