इन्फोसिस पाठोपाठ डॉ. रेड्डी लॅबोरेटरीमध्येही कर्मचारी कपात
४०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले
14-Apr-2025
Total Views |
नवी दिल्ली : भारतातील फार्मा क्षेत्रातील महत्वाची कंपनी असलेल्या डॉ. रेड्डी लॅबोरेटरीकडून आता पर्यंत ४०० लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. कंपनीकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांवर केल्या जाणाऱ्या खर्चात २५ टक्के कपात करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्याचाच ही नोकर कपात हा एक भाग आहे. आतापर्यंत कंपनीतून ज्या व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न १ कोटींच्या घरात होते अशा सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोकऱ्या सोडून जाण्याचे आवाहन केले गेले आहे.
कंपनीतील ५० ते ५५ वर्षे वयोगटातील अनेक कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यास कंपनी व्यवस्थापनाकडून सांगीतले आहे. रेड्डी लॅबोरेटरी कडून नुकतीच त्यांच्या कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात होते असे सांगण्यात येत आहे. कंपनीकडून डिजीटल थेरपीच्या क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी नेस्टलेबरोबर करार झाला आहे. यानवीन प्रकल्पांसाठी कंपनीकडून बऱ्याच प्रमाणात कर्मचारी भरती करण्यात आली होती. परंतु हे नवीन प्रकल्पांकडून अपेक्षित यश न मिळाल्यामुळे कंपनीवर अखेर कर्मचारी कपातीची वेळ आली आहे. या कारणांमुळे या कंपनीत मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात हातात घेण्यात आली आहे.
डॉ. रेड्डी लॅबोरेटरीकडून कर्मचाऱ्यांवरील खर्चात ७ टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. तरीही कंपनीच्या नफ्यात फार मोठी वाढ न झाल्यामुळे त्यातून कंपनीला ठोस निर्णय घेणे भागच होते. यामुळे कंपनी व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे. इन्फोसिसनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करणारी डॉ. रेड्डी लॅब ही दुसरी मोठी कंपनी आहे.