आयुर्सखी मनीषा...

    14-Apr-2025
Total Views |
 
Dr. Manisha Anaskar Bankar
 
आधुनिक जीवनशैली आधारित आजारांवर आयुर्वेद चिकित्साआधारे उपचार करत, महिलांना निरोगी आरोग्याचा कानमंत्र देणार्‍या डॉ. मनीषा अनासकर बनकर यांच्याविषयी...
 
आज मासिक पाळी आणि प्रसुती ही अत्यंत गंभीर आणि चिंतेची बाब होत आहे. आज मुली करिअर आणि आर्थिक स्थैर्यच्या पाठीमागे धावताना दिसतात. मात्र, यातूनच मुलींना ‘हार्मोनल इम्बॅलन्स’, त्यातूनच पुढे वंध्यत्व यांसारख्या गंभीरतेला तोंड द्यावे लागते. करिअरमधून जमवलेली पुंजी, पुन्हा मातृत्वासाठी खर्च करण्याची वेळ येते. यासाठी योग्य वयात लग्न, योग्य वयात प्रसुती आणि योग्य वयात पालकत्व यासर्व बाबींचे महत्त्व मला समोर आणायचे आहे, असे ‘संजीवनी आयुर्वेदिक क्लिनिक’ व ‘पंचकर्म सेंटर’च्या सहसंचालिका आणि ‘वोमिशा’ या संस्थेच्या संचालिका डॉ. मनीषा बनकर सांगतात. डॉ. मनीषा यांचे आधुनिक जीवनशैली आणि आयुर्वेद विषयातील कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे.
 
डॉ. मनीषा यांनी इयत्ता आठवीपासूनच डॉक्टर होण्याचे ध्येय निश्चित केले. आपण आयुर्वेदाचा अभ्यास करण्याचे मनीषा यांनी दहावीत ठरवले. मात्र, अभ्यास करताना ‘एमबीबीएस’ क्षमतेचाच करायचा, अशी खूणगाठ डॉ. मनीषा यांनी मनाशी पक्की बांधली. मनीषा यांनी डॉक्टर व्हावे, ही त्यांच्या वडिलांची इच्छा होती. त्यामुळे मनीषा यांची जडणघडण त्याच पद्धतीने झाली. डॉ. डी. वाय. पाटील, नेरुळ येथून मनीषा यांनी ‘बॅचलर ऑफ आयुर्वेद अ‍ॅण्ड सर्जरी’ (बीएएचएमएस)चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 2013 मध्ये डॉ. मनीषा यांचे लग्न झाले. मनीषा यांनी पुढे अधिक शिक्षण घेण्याच्या प्रेरणेने, ‘टिळक विद्यापीठ, पुणे’ इथे प्रवेश घेत ‘योग’ या विषयात डिप्लोमा केला. ‘पोस्ट ग्रॅडज्युएशन डिप्लोमा इन एमेरजन्सी सर्व्हिसेस’(पीजीडीएमएस)मधून पूर्ण केला. हा अभ्यासक्रम त्यांनी, पुण्यातील रुबी येथून पूर्ण केला. स्वतंत्रपणे क्लिनिक सुरू करून प्रत्यक्ष प्रॅक्टिस करावी, हेच ठरविलेले असल्याने डॉ. मनीषा यांनी आपल्या पतीच्या क्लिनिकमध्येच प्रॅक्टिस सुरू केली. डॉ. बनकर दाम्पत्य संजीवनी क्लिनिकच्या माध्यमातून, गेली 16 ते 17 वर्षे ‘आयुर्वेद आणि पंचकर्म’ याविषयक उपचार आणि मार्गदर्शन देतात.
 
डॉ. मनीषा किंवा त्यांचे पती यांना वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पार्श्वभूमी नसल्याने, उभयतांचा प्रवास शून्यातून सुरू झाला. 2013 ते 2017 हा संपूर्ण कालावधी नवीन औषधे तयार करणे, उपचार पद्धती विषयक संशोधन आणि अभ्यास, कोणत्या आजारावर उपचार करावेत याविषयी त्यांनी अभ्यास केला. नंतर डॉ. बनकर यांनी आपल्या उपचार पद्धतीतून, जीवनशैली आधारित आजार म्हणजेच मधुमेहासारख्या आजारातून मुक्त करणे, गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज असलेल्या रुग्णांना उपचार करून, कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय स्वतःच्या पायावर चालायला लावले. याचसोबत, त्वचारोग, किडनीस्टोन, हृदयासंदर्भातील आजार यांसारख्या आजारांवर त्यांच्या रुग्णांनी मात केली. गेल्या 15 वर्षांत 40 हजार रुग्णांवर डॉ. बनकर यांनी उपचार केले असून, 28 हजारांहून अधिक रुग्णांचे गुडघे आणि सांधे यासंबंधीचे आजार शस्त्रक्रियेशिवाय बरे केले आहे.
 
डॉ. मनीषा या केवळ ठाणे आणि मुंबईच नाहीतर, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत, विविध सत्रांच्या आयोजनातून आधुनिक जीवनशैली आणि आयुर्वेद याविषयी मार्गदशन करतात. डॉ. मनीषा बनकर या ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही स्वरूपात, देशभरात सल्ला देतात. ऑनलाईन सल्ला हा झूम किंवा ईमेल स्वरूपात केला जातो. अनेकजण हे पहिल्या भेटीत सल्ला घेतात आणि त्यानंतरचे संपूर्ण उपचार हे ऑनलाईन पद्धतीने घेतात. डॉ. मनीषा या ‘कॉर्पोरेट हेल्थ स्पीकर’ म्हणूनही, नामांकित कंपन्यांसोबत कार्यरत आहेत. जीवनशैली आधारित आजाराच्या उपचारात आपण विशेषतज्ज्ञ व्हावे, असे का ठरविले? याबाबत बोलताना डॉ. मनीषा सांगतात, “आज एक बटन दाबले की, काम होतात. यामुळे शरीराची हालचालच नसल्याने, अनेक आजार बळावत आहेत. हे लक्षात घेता 14 वर्षांपूर्वीच आम्ही जीवनशैली आधारित आजारांवर उपचार करण्याचा निर्णय घेतला.”
 
एक महिला असल्याने आपण अधिकाधिक महिलांच्या आरोग्यविषयक काम करावे, या हेतूने डॉ. मनीषा यांनी ‘वोमिशा’ या संस्थेची स्थापना केली. आज महिलांचे आरोग्य हा सर्वाधिक दुर्लक्षित घटक आहे. समाजातील प्रत्येक महिला तंदुरुस्तच असेल, तरच समाज निरोगी आणि आनंदी होईल. महिलांचे आरोग्य, मासिक पाळी, कॉटन पॅडच्या वापराचे महत्त्व, पाळीच्या दिवसतील आदर्श दिनचर्या याबाबत जनजागृतीचे काम डॉ. मनीषा पूर्वीपासूनच करत होत्या मात्र, ‘वोमिशा’ या संस्थेच्या स्थापनेतून या कामाला मूर्त स्वरूप आले.
 
भविष्याचा वेध घेताना डॉ. मनीषा यांनी, ‘वोमिशा’ या विशेष बातमीपत्राची माहिती दिली. या बातमीपत्रातून महिलांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करण्यात येईल. वयवर्षे दहा ते ज्येष्ठ महिला यांच्यासाठी ही माहिती असेल. यासोबतच, महिला सशक्तीकरणासाठी ‘वोमिशा’ ही संस्था काम करतेच आहे. सामाजिक आरोग्य जपणे सर्वात आज महत्त्चाचे असून, सध्या अनेक महिला ताणतणावातून जात आहेत. यातून महिलांमधील व्यसनाधीनता वाढते आहे. या महिलांना ताणतणावापासून मुक्त राहण्यासाठी, डॉ. मनीषा यांची ‘वोमिशा’ ही संस्था काम करणार आहे.
 
‘आधुनिकता’ आणि ‘आयुर्वेद’ यांची सांगड घालत, ‘वोमिशा’ ही संस्था महिला आरोग्य या विषयात आपली भविष्यातील वाटचाल निर्धारित करते आहे. डॉ. मनीषा अनास्कर बनकर यांचे आयुर्वेद क्षेत्रातील कार्य तर उल्लेखनीय आहेच मात्र, महिलांच्या आरोग्यविषयीची त्यांची तळमळही कौतुकास पात्र आहे. डॉ. मनीषा बनकर यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!