बाबासाहेब हे आमचे राष्ट्रपुरूष! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
चैत्यभूमी येथे अभिवादन
14-Apr-2025
Total Views |
मुंबई : बाबासाहेब उत्तम प्रशासक होते. त्यांनी विकासाचा पाया रचला. त्यामुळे बाबासाहेब हे आमचे राष्ट्रपुरूष आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, १४ एप्रिल रोजी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी दिनी चैत्यभूमी येथे अभिवादन केले.
यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, "जगभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते आणि सगळीकडे तोच उत्साह पाहायला मिळतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानामुळे आज आपण एकसंघ भारत बघतो आहे. त्याच संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाले असून आपण अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहोत."
"हा देश तयार करण्यासाठी त्याचा पाया तयार करण्याचे काम बाबासाहेबांनी केले. तसेच चुकीच्या रुढीपरंपरांतून देशाला बाहेर काढत समता स्थापित केली. संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा समान अधिकार, संधीची समानता आणि प्रत्येकाची स्वप्न पूर्ण होऊ शकतील, असे संविधान त्यांनी आपल्याला दिले. बाबासाहेबांचे अत्यंत मेधावी असे छात्र जीवन राहिले. सातत्याने शिक्षण घेत असताना समाज उत्थानाचा विचार त्यांनी कधी सोडला नाही. त्यांनी केलेले समाजनिर्मितीचे कार्य अतुलनीय आहे," असेही ते म्हणाले.
संविधानाचा गाभा भगवान गौतम बुद्धांच्या विचारातून
"संपूर्ण विश्वाला शांतीच्या आणि विचाराच्या जोरावर जिंकणाऱ्या भगवान गौतम बुद्धांचा विचार बाबासाहेबांनी स्विकारला आणि तोच विचार भारताच्या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या संविधानाचा गाभा भगवान गौतम बुद्धांच्या विचारातूनच तयार झाला आहे. हा शाश्वत विचार रुजवण्याचे काम बाबासाहेबांनी केले. बाबासाहेबांना नमन करताना एकच संकल्प घेतला पाहिजे की, कुठल्याही परिस्थितीत संविधानिक मुल्यांपासून आपण दूर होणार नाही आणि भारताचे संविधान आपल्यासाठी सर्वोच्च असेल," असेही त्यांनी सांगितले.