"उद्धव ठाकरेंना सत्तेत यायचे आहे पण..."; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा राऊतांना खोचक टोला
14-Apr-2025
Total Views |
मुंबई : केवळ तुम्ही सत्तेत नाही. तुम्हाला यायचे आहे पण कुणी घेत नाही, म्हणून अमितभाईंचा किती दुस्वास करणार? असा खोचक सवाल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना केला आहे. त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, "संजय राऊत गेले तीन दिवस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर बोलत आहेत. पण त्यांना कुणी प्रतिसादच देत नाही. अमितभाईंचे छत्रपती शिवाजी महाराजांवरील ५०० पानांचे पुस्तक येत्या काही दिवसांत प्रकाशित होणार आहे. ते वाचल्यावर राऊतांनासुद्धा चक्कर येईल. केवळ तुम्ही सत्तेत नाही. तुम्हाला यायचे आहे पण कुणी घेत नाही, म्हणून अमितभाईंचा किती दुस्वास करणार?" असा सवाल त्यांनी केला.
"महानगरपालिकेच्या निवडणूका येईपर्यंत तुम्हाला उमेदावर उभा करण्यासाठी रोज घरोघरी जाऊन आग्रह करावा लागेल. कारण तुमचे सगळे सिटींग लोक जात आहेत. पुण्यातील तुमचे ५ नगरसेवक भाजपमध्ये आले. मुंबईत तुमचे ९२ पैकी ५७ नगरसेवक एकनाथ शिंदेंकडे गेले. तुमच्याकडे काय राहिलंय? यावर बोलायचे सोडून अमितभाई काय बोलले यावर तुम्ही बोलत आहात. शिवसेना (उबाठा) देवेंद्रजी, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि वरच्या नेतृत्वाच्या मागे लागून सत्तेत आली नाही तर महानगरपालिकेत मुंबईसारख्या ठिकाणी उभे करण्यासाठी माणसं मिळणार नाहीत," अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली.
राऊतांच्या मनात जातीवाद!
ते पुढे म्हणाले की, "संजय राऊत जे म्हणतील ते खरे आहे, असे न मानता ते खोटे आहे, असेच म्हणावे लागेल. महाराष्ट्रात भाजपला १३७ जागा मिळाल्या. सहयोगी पक्ष म्हणून महायूतीला २३५ जागा मिळाल्या. या २३५ आमदारांनी एकमुखाने देवेंद्रजींना मुख्यमंत्री केले. त्यामुळे महाराष्ट्रात देवेंद्रजींचे सर्वमान्य व्यक्तीमत्व आहे. २०१४ ते १९ ला एकमेकांत अडकलेल्या आरक्षण आणि सुविधा या दोन गोष्टी त्यांनी वेगळ्या केल्या. आरक्षण नसतानाही सुविधा देणे सुरु केले. त्यानंतर त्यांनी आरक्षणही दिले. हायकोर्टात ते टिकवले. मराठ्यांना पहिले आरक्षण देवेंद्र फडणवीसांनी दिले. त्यामुळे दलित, मराठे, ओबीसी त्यांच्याविरोधात जाऊच शकत नाही. ओबीसी मंत्रालय देवेंद्रजींनी सुरू केले. त्यामुळे देवेंद्रजी विरुद्ध फुले आंबेडकर अशा प्रकारचा वाद संजय राऊतांच्या मनात आहे. हा त्यांच्या मनात असलेला जातीवाद व्यवहारात येऊच शकत नाही," असेही ते म्हणाले.