छत्रपती संभाजीनगर : चंद्रकांत खैरेंसाठी शिवसेनेचे दार बंद आहे. त्यांना आमच्याकडे एन्ट्री नाही, असे विधान खासदार संदीपान भुमरे यांनी केले. त्यांनी सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी संवाद साधला.
खासदार संदीपान भुमरे म्हणाले की, "चंद्रकांत खैरेंसाठी शिवसेनेचे दार बंद आहे. ते सांगतात की, मी एकनिष्ठ आहे आणि आम्हाला गद्दार म्हणतात. मग अशा लोकांना आम्ही घेणार नाही. त्यांनी अनेक वर्षे पदे भुषवली आता त्यांनी घरी बसावे. खैरेंना शिवसेनेत एन्ट्री नाही."
राऊतांना घेऊन आमच्या पक्षाचं वाटोळं करायचं आहे का?
"उबाठा गटात संपूर्ण महाराष्ट्रात फक्त उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघेच राहतील. तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकात खैरे आणि अंबादास दानवे हेच राहतील. आम्हाला संजय राऊतांची गरज नाही. आम्हाला कोणाचीच गरज नाही. आम्हाला आमचे भरपूर आहेत. संजय राऊतांना घेऊन त्यांच्या पक्षाचं झालं त्याप्रमाणे आम्हाला आमच्या पक्षाचं वाटोळं करायचं आहे का? आमचे सगळे कार्यकर्ते सक्षम आहेत. जिह्लापरिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, महानगरपालिका या सगळ्या ठिकाणी महायूतीचा झेंडा फडकणार आहे," असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.