आपल्या ऐतिहासिक संपन्न वारसा सांगणार्या अनेक कलाकृती, शिल्पे देशभरात आहेत. महाराष्ट्रातही यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मुंबईजवळ असणार्या अंबरनाथाचे शिवमंदिर हादेखील असाच एक समृद्ध इतिहासाचा वारसाच! शिलाहार राजांनी उभारलेल्या या मंदिराचा इतिहास, त्यातील नक्षीकाम व या मंदिराची वैशिष्ट्ये यांचा घेतलेला मागोवा...
आशा, अपेक्षा, उत्साह आणि संघर्ष यांनी भरलेले महाराष्ट्राचे धडधडते हृदय म्हणजे मुंबई. बॉलीवूडचा झगमगाट, लोकलचे जाळे आणि सतत धावणारी माणसे या सर्वांच्या खूप आधीची मुंबई आपल्याला माहीत आहे का? ती मुंबई जिथे भारतातील सर्वांत महत्त्वाच्या घारापुरी म्हणजेच एलिफंटा, कान्हेरी (संजय गांधी नॅशनल पार्क) आणि जोगेश्वरी या लेणी कोरल्या गेल्या! ते मुंबई जिथे सोपारा, कल्याण आणि चौल यांसारखी महत्त्वाची बंदरे निर्माण झाली आणि तिथून जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात व्यापारदेखील होत होता. याच जुन्या मुंबईचे एक महत्त्वाचे वैभव म्हणजे अंबरनाथ उपनगरात असणारे शिवाला अर्पण केलेले प्राचीन मंदिर.
अंबरनाथ रेल्वे स्थानकापासून फक्त दोन किमी अंतरावर असणारे हे मंदिर, आजपासून साधारण 950 वर्षे आधी शिलाहार राजांच्या कालखंडात बांधले गेले. शिलाहार राजांचा प्रभाव कोल्हापूर/कर्हाड हे भाग आणि उत्तर व दक्षिण कोकणच्या भागावर होता. श्रीस्थानक म्हणजेच आजचे ठाणे इथे शिलाहार राजघराण्याची राजधानी होती. अनेक उत्तमोत्तम राजे या घराण्यात होऊन गेले, ज्यांनी भारताच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे.
इसवी सन 1886 मध्ये सर्वेक्षण करत असताना या मंदिरात एक शिलालेख मिळाला. त्यातला मजकूर आपल्याला ‘बॉम्बे ब्रांच ऑफ द रॉयल एशियाटिक सोसायटी’ या जर्नलमध्ये वाचायला मिळतो. या लेखाचे महत्त्व खूप मोठे आहे. कारण, मंदिर कधी बांधले गेले, याचा कालखंड आणि मंदिराचे मूळ नाव या लेखांमध्ये नमूद केलेले आहे.
श्रावण शुद्ध नवमीच्या दिवशी, इसवी सन 1060 मध्ये हे आम्रनाथाचे मंदिर बांधून पूर्ण झाले. आज आपण ज्याला अंबरनाथ म्हणतो तो याच शब्दाचा अपभ्रंश होऊन तयार झालेला शब्द आहे. या संपूर्ण परिसरात फक्त मंदिरच नाही तर विद्यादानाचे केंद्र देखील होते, तसेच पाण्याच्या साठ्यासाठी तयार केलेले एक कुंड देखील इथे दिसते.
महाराष्ट्रात अनेक मंदिरांची निर्मिती झाली, त्यात भूमीज शैलीमध्ये बांधले गेलेले हे आद्य मंदिर. मुखमंडप, गूढमंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची बाहेरून आत जाताना रचना आहे. या मंदिराचे झालेले अनन्वित नुकसान आणि त्यातून स्थापत्याला पोचलेली इजा, याचे अजून भयंकर परिणाम होऊ नयेत म्हणून पुरातत्त्व खात्याने लोखंडी तुळईचे आधार मंडपातल्या अनेक खांबांना दिलेले आहेत. त्या आधारे हे स्तंभ तग धरून उभे आहेत. मंडप आणि गर्भगृहातील स्तंभ अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असून या स्तंभांवरच्या वेगवेगळ्या भागात कार्तिकेय, नृत्यगणेश, देवी, महिषासुरमर्दिनी अशी अनेक वेगवेगळी शिल्प कोरलेली आहेत. याच स्तंभांच्या सर्वात वरच्या भागात भारवाहक यक्ष देखील कोरलेले दिसतात. मंडपात वर बघितले की आपल्याला थक्क करून टाकणारे वितान म्हणजेच मंदिराचे छत दिसते. हे वितान विविध प्रकारच्या नक्षीने नटलेले असून याच्या आजूबाजूच्या भागात अनेक मूर्ती देखील कोरलेल्या दिसतात. इथून काही पायर्या उतरून आपल्याला गर्भगृहामध्ये अमरेश्वराच्या दर्शनासाठी प्रवेश करावा लागतो. दुर्दैवाने आज या मंदिराचे शिखर पूर्ण अवस्थेत नाही आणि अनेक शिल्प देखील मोठ्या प्रमाणात झिजली आहेत तरी देखील त्यातले सौंदर्य आणि कथा या लपून राहत नाहीत.
या मंदिरातल्या काही वैशिष्ट्यपूर्ण मूर्तींचा परिचय आपण इथे करून घेऊयात. मंदिराच्या मंडपात, गर्भगृहाकडे तोंड करून उभे राहिल्यानंतर डावीकडे असणार्या दाराच्या वरती एक शिल्पपट आहे, या शिल्पात मधोमध कलश असून तो एका उंच जोत्यावरती ठेवलेला आहे आणि आजूबाजूला काही माणसं हात जोडून, हातामध्ये हार घेऊन उभी आहेत. हे शिल्प दुसरे तिसरे कुठले नसून तर साक्षात या मंदिराचा कलशारोपण विधी दाखवणारे शिल्प आहे. आजूबाजूला उभी असलेली माणसं म्हणजेच मंदिर बांधणारे आचार्य आणि बांधून घेणारा राजा आणि त्यांचे साथीदार अशी आहेत. मंदिर बांधणी विधी दाखवणारे हे अतिशय दुर्मीळ शिल्प या मंदिरात बघायला मिळते.
मंदिराच्या बाह्यांगावर नटराजाचे अतिशय सुंदर शिल्प आहे. 16 हातांचा नटराज असून, आज यातले चार-पाच हातच शिल्लक आहेत. अतिशय सुंदर कोरलेले जटामुकुट, डोक्यावरती पकडलेला त्रिशूळ, चेहर्यावरचे शांत भाव आणि पायाशी दोन्ही बाजूला असणारे वादक अशी अतिशय बोलकी मूर्ती आपल्या कलाकारांनी घडवलेली आहे. या संपूर्ण ब्रम्हांडाच्या रचनेची लय सांभाळण्याचे काम हा नटराज आपल्या नृत्यातून करत असतो.
तिथूनच पुढे मंदिराच्या डावीकडच्या बाह्य भिंतीवरती शिवाची अजून एक सुंदर मूर्ती कोरलेली आहे. गजासुर नावाच्या असुराने पार्वतीच्या लालसेने शिवावरती आक्रमण केले आणि शिवाने या असुराचा संहार केला अशी ही कथा आहे. बर्याचदा गजासूरसंहार आणि अंधकासूरसंहार अशा दोन्ही कथा एकाच शिल्पात दाखवलेल्या दिसतात. प्रस्तुत शिल्प हे अतिशय भग्न असून याची मोठ्या प्रमाणात झीज देखील झालेली आहे, पण यातल्या काही गोष्टी आपल्याला या शिल्पाकडे ओढून घेतात. त्या गजासुराचा संहार करत असताना त्याचे संपूर्ण कातडे फाडून आपल्या डोक्यावरती ते कातडे ताणून धरलेला शिव इथे दिसतो. त्याच्या कमरेचा आणि मानेचा बाक हा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे, शिवाच्या शेजारी उजवीकडे त्या गजासुराचे मुख देखील कोरलेले आपल्याला दिसते. भग्न तरीही सुंदर असे हे विलक्षण शिल्प आहे.
शिवकथांबरोबरच इथे विष्णूची वेगवेगळी रूपे दिसतात. नृत्यगणेश, अनेक वेगवेगळ्या मर्दला म्हणजेच वाद्य वाजवणार्या स्त्रिया, नायिका, देवता, गंधर्व, सुरसुंदरी आणि अनेक पुराणकथा देखील इथे शिल्परूपामध्ये साकारलेल्या आहेत. कधीकाळी गावाच्या बाहेर असणारे हे स्थान आता भरवस्तीत आले आहे. या लेखांमध्ये शेवटी मी नेहमी माझा नंबर आणि एमेल देतो. कुठल्याही मंदिराला आपण भेट द्यायला जाणार असाल तर एकदा नक्की मेल किंवा मेसेज करा, तिथल्या महत्वपूर्ण गोष्टींची माहिती घेऊन मगच ते वारसा स्थळ बघायला बाहेर पडा.
अंबरनाथचं शिवमंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर आपल्या हजारो वर्षांच्या इतिहासाचं, वास्तुकलेचं आणि भक्तिभावाचं एक जीवंत प्रतीक आहे. आज आपण इथे जाऊन फोटो काढतो, शांतता अनुभवतो, पण यापेक्षा अधिक महत्त्वाचं म्हणजे त्याची जपणूक आणि संवर्धन करणं. आपल्या वर्षाची ओळख आपल्याबरोबरच आपल्या घरातल्या तरुण पिढ्यांना होणं हे देखील तितकेच गरजेचे आहे आणि मुंबईकरांसाठी एखाद्या रविवारी सकाळी या अंबरनाथ मंदिराची भेट अजिबातच अवघड नाही.
इंद्रनील बंकापुरे