आजकाल घरात एकटे आई किंवा वडील आणि घराबाहेर स्वच्छंदी आयुष्य जगणारी मुले असे चित्र सगळीकडेच दिसते. बदललेल्या जीवनमानामध्ये घरातील वृद्धांना वेळ देण्याचा कल कमी होत असतो. एकीकडे समवयस्कर जगाचा निरोप घेत असतात, तर दुसरीकडे घरातील माणसांत अनुभवायला येणारा एकांत या ज्येष्ठांच्या समस्या आहेत. त्यामुळे ज्येष्ठपर्वातही जोडीदाराची गरज अधोरेखित होते. याच विषयावर भाष्य करणार्या ‘अशी ही जमवा जमवी’ चित्रपटाचे समीक्षण...
'एज इज जस्ट नंबर’ ही संकल्पना तशी जुनीच, अगदी रोजच्या जीवनात आपल्याला संवादातून ऐकण्यात येणारी. या संकल्पनेवरच आधारित चित्रपट म्हणजे, ‘अशी ही जमवा जमवी.’ या चित्रपटाची कथा आणि पात्र हसवता हसवता कधी डोळ्यात अश्रू आणतात, हे समजतही नाही. हीच सहजता या चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे. ‘अशी ही जमवा जमवी’ या चित्रपटाचे कथानक मोहन आणि वंदना यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे. मोहन (77) आणि वंदना (72) या सत्तरी ओलांडून गेलेल्या जोडप्याची कथा, जमवा जमवी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरते. मोहन म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके अशोक सराफ आणि वंदना म्हणजे दिग्गज अभिनेत्री वंदना गुप्ते.
चित्रपटाची सुरुवात होते ती, धम्माल अॅनिमेशनपासून. त्यात अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांचे मोहक कॅरिकेचर्स आणि या चित्रांच्या पार्श्वभूमीला ‘दोघे जाऊ आता फुलाला फूल लावू’ हे चित्ररूपी संगीत, रूपेरी पडद्यावर पाहताना मनोरंजनाच्या थाळीतला पहिला घास चाखल्याचा आनंद मिळतो. अॅनिमेशन चित्रातून मोहन आणि वंदना यांच्या प्रेमकथेला सुरुवात होते, ती देशपांडे यांच्या ‘षष्ट्यब्दी’ला. त्यानंतर गाठीभेटी वाढल्याने ‘आपण लग्न करायचे का?’ असा विचार ते करू लागतात. मात्र, आता हे वाचताना जो तुमच्या मनात प्रश्न आला, तोच म्हणजे ’या वयात लग्न?’ हा प्रश्न या दोघांनाही पडतो. याच प्रश्नाचे उत्तर घरच्यांना देण्यासाठी केलेली जमवा जमवी पाहताना, हास्याचे फवारे उडायला लागतात.
‘अशी ही जमवा जमवी’ या चित्रपटात अशोक सराफ, वंदना गुप्ते, सुनील बर्वे, चैत्राली गुप्ते, मिलिंद पाठक, सुलेखा तळवलकर, पुष्कराज चिरपुटकर, ओमकार कुलकर्णी, तनिष्का विशे या कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळते. वयाच्या 77व्या वर्षांच्या माणसाची ऊर्जा, तरुण नटांनाही लाजवेल अशी होती. प्रत्येक वाक्यानंतर जेथे थांबले जाते, तिथे ती जागा आपल्या हावभावाने कशी भरून काढता येईल ते शिकावे, तर अभिनेते अशोक सराफ यांच्याकडूनच. याकरिता चित्रपटातला एक प्रसंग, विशेष अधोरेखित करावासा वाटतो. चित्रपटाच्या सुरुवातीला संवाद नसताना, केवळ चेहर्यावरच्या हावभावाने मोहन (अशोक सराफ) वंदनाला इशारा करताना दिसतात. कोणत्या ठिकाणी कोणता अभिनय केला पाहिजे, याचे अचूक गणित मांडताना त्याची बरोबरी, विनोदाने कशी करता येईल, हे अशोक सराफ यांच्या कामातून प्रत्येकवेळी दिसून येते. त्यामुळे तो प्रसंग पाहताना ‘अशोक सराफ किती ताकदीचे अभिनेते आहेत,’ ही दाद द्यावीशी वाटते.
अशोक सराफ यांना साथ देणारी अभिनेत्री वंदना गुप्ते यांचा अभि, चित्रपटाप्रमाणे रंजक प्रवासासारखा दिसतो. ‘प्यार किया तो डरना क्या’ म्हणणारी मोहनची वंदू कधी बिनधास्त, तर कधी घाबरट, कधी खट्याळ, तर कधी हळवी असे हे गोड पात्र, वंदना गुप्ते यांनी फार सुरेख रंगवलेले दिसून येते. मोहन आणि वंदना यांच्या प्रेमाच्या सफरमध्ये, त्यांची नातवंडदेखील प्रवास करतात. सुरुवातीला या प्रवासात बरेच स्पीडब्रेकर लागले आणि मध्यावर एक मोठा खड्डा, म्हणजे मोहन यांची नात सारा. सारा या चित्रपटात फुलपाखराप्रमाणे बागडणारे पात्र. कसले बंधन नसल्यामुळे, मनमोकळेपणाने जगणार्या या मुलीचे काम तनिष्काने फार छान हाताळले आहे. वंदना यांचा नातू अभि मात्र, मोजून मापून आयुष्य जगणारा मुलगा दाखवला आहे. याचे पात्र ओमकार कुलकर्णीने साकारले असून, काही ठिकाणी याचा अभिनय अतिरंजित वाटायला लागतो. पण, आजीसोबत असतानाचा अभि, प्रत्येक आजीला असाच एक गोड नातू असावा, अशी भावना निर्माण करून देणारा वाटतो. जसे मी लिहिले, चौकटीत मोजून मापून राहणारा अभि, त्याच्यामागे त्याच्या वडिलांचा हात आहे. त्याचे वडील काही या चित्रपटाचे खलनायक नाहीत, तर आताच्या समाजातील मानसिकतेप्रमाणे वावरणारे आहेत. त्यामुळे शिस्त, चिडचिड करणार्या निरंजनचे पात्र, या प्रवासाचा चालक कसा होतो, याची तर गंमत पुढे आहे.
जसे वर नमूद केल्याप्रमाणे, प्रेमाच्या या प्रवासात मध्यावर गाडी एका खड्ड्यात आदळते. म्हणजे नेमके काय? तर आजी-आजोबांच्या प्रेमाची जमवा जमवी कशी करता येईल, या विचारात असलेल्या अभि आणि साराचे प्रयत्न या प्रवासाला आणखीन रंजक बनवत जातात. पण, चित्रपटाचे दिग्दर्शक लोकेश गुप्ते या प्रवासाला एक वेगळे वळण देतात. सुरुवातीपासून खळखळून हसवणारी कथा कधी डोळ्यात पाणी आणायला लावते, तर कधी गंभीर विचार करायला लावते. कथा जरी साधी असली, तरी तिला दिग्दर्शकाच्या दृष्टीचा आणि लेखकाच्या विचारांचा स्पर्श झाला की, त्या साध्या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. याचे उत्तम उदाहरण ‘अशी ही जमवा जमवी.’
या प्रेमाच्या प्रवासात हास्य, रौद्र, शृंगार, शांत आणि करुणा या रसांना आणखी उजाळा देण्यासाठी, दिले गेलेले पार्श्वसंगीत या चित्रपटाचा आत्मा आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कलाकरांचा उत्तम अभिनय, चित्रपटाच्या कथेचे सुंदर लिखाण आणि या सगळ्याला मधुर संगीताची साथ हे अगदी मेजवानीतल्या श्रीखंडाप्रमाणेच. प्रत्येक प्रसंगात एक गोडवा देणारे संगीत जे कायमच गुणगुणावसे वाटते. ‘मस्तीखोर तू, मस्तीखोर मी’ या गाण्यात, आजी आणि आजोबांचे नातवंडांसोबतचे नाते, एकमेकांसोबत घालवलेला वेळ हे दृश्य आणि त्यातून मिळणारा संदेश, खरोखरीच छान टिपले गेले आहेत. हे दृश्य टिपणारे छायाचित्रकार अर्जुन सोरटे आणि चित्रपटाचे संगीत क्षितिज पटवर्धन यांनी केले आहे.
मोहन आणि वंदना वयाचा विचार न करता, सरत्या वयात एकमेकांचा आधार बनण्यासाठी प्रेम करतात. या प्रेमात पारदर्शकता दिसून येते. संपूर्ण आयुष्य मुलांना वाढवण्यात व मुलांच्या गरजा पुरवण्यात जाते. मुलं शिकली, चांगल्या नोकरीला लागली की, मुलांना वाढवणारा व्यक्ती घरच्या जुनाट वस्तुंप्रमाणे होऊन जातो. फरक एवढाच असतो की, ही वस्तू चालू शकते, बोलू शकते म्हणून ती नजरेत येते. पण, अशा एकटेपणात आपली काळजी घेणारा, आपल्याच वयाचा कोणीतरी असावा, हा विचार मनात येणे काही चूक नाही. बदलत्या समाजाप्रमाणे ही कथासुद्धा मोहन आणि वंदना यांच्या जमवा जमवीला संमती देणार का? या प्रश्नाचे उत्तर लेखात लिहायचे झालेच, तर खूप सोपे आहे. ‘अशी ही जमवा जमवी’ या चित्रपटातल्या मोहन आणि वंदनाच पुढे काय होते? ते पाहाण्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण चित्रपट चित्रपटगृहात पाहावा लागेल.
दिग्दर्शक : लोकेश गुप्ते
कलाकार : अशोक सराफ, वंदना गुप्ते, सुनील बर्वे, चैत्राली गुप्ते, मिलिंद पाठक, सुलेखा तळवलकर,
पुष्कराज चिरपुटकर, ओमकार कुलकर्णी, तनिष्का विशे
रेटिंग : ****