कल्याण : कल्याणमधील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याने रविवारी सकाळी तळोजा कारागृहात आत्महत्या केली आहे. या प्रकरणात आरोपी विशाल याला अटक झाल्यापासूनच समाजातील सर्वच स्तरातून त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली जात होती. परंतु आज विशालच्या आत्महत्येमुळे पिडीतेला नैसर्गिकरित्या न्याय मिळाला आहे असे म्हणत समाजाच्या विविध स्तरातून आनंद व्यक्त केला जात आहे . पिडीतेला न्याय मिळाला असला तरी कायद्याने त्याला फाशी झाली असती तर इतरांवर कायद्यांचा धाक राहिला असता असे सर्वच स्तरातून बोलले जात आहे.
कल्याण पूर्वेत एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निघृण हत्या करण्यात आल्याची घटना 23 डिसेंबर 2024 रोजी घडली होती. आरोपी विशाल याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली. या कामात आरोपी विशाल याची पत्नी साक्षी गवळी हिने देखील त्याला मदत केली. मुलीच्या हत्येनंतर विशाल आणि साक्षी या दोघांनी मुलीचा मृतदेह बापगाव परिसरात फेकून दिला होता. या प्रकरणात तांत्रिकदृष्टया सर्व पुरावे जमा करण्यात आले होते. मुलीचे अपहरण करून तिचा मृतदेह फेकून देण्याच्या घटनेतील काही सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना उपलब्ध झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी आधी विशाल गवळी याची पत्नी साक्षी हिला अटक केली. तिच्या खुलाश्यानंतर बुलढाणा येथील शेगावमधून एका सलूनच्या दुकानातून आरोपी विशाल याला अटक केली.
शासनाने कल्याणमधील मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची विशाल गवळीने हत्या केल्याच्या घटनेची गंभीर दखल घेतली. हा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल यादृष्टीने शासनाने ज्येष्ठ विधीज्ञ अॅड उज्जवल निकम यांची हा महत्त्वपूर्ण खटला चालविण्यासाठी विशेष वकील म्हणून नियुक्ती केली होती. या प्रकरणातील आरोपी विशाल आणि त्याच्या पत्नी साक्षीला कठोर शिक्षा होण्यासाठी पोलिसांनी या गुन्हयाचा सखोल तपास केला होता. दोन महिन्यापूर्वी या घटनेचे आरोपपत्र पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जलदगती न्यायालयात दाखल करण्यात आले होते. हा खटला न्यायालयात सुरू होता. या प्रकरणाच्या जलदगती न्यायालयात सुनावण्या सुरू झाल्या होत्या. सुरक्षिततेचा विचार करून पोलिसांनी विशाल याला तळोजा येथील तुरुंगात ठेवले होते. त्याच्या कोठडीलगतच्या स्वच्छतागृहात विशाल याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीला आला आहे. तळोजा तुरूंग प्रशासनाने ही माहिती खारघर पोलिसांना दिली आहे. विशाल गवळीच्या कल्याणमधील कुटुंबियांना ही माहिती पोलिस, तुरूंग प्रशासनाने दिली आहे.
विशालवर एकूण आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये विनयभंग, अनैसर्गिक अत्याचार, चोरी, खुनाचा प्रयत्न, तडीपारच्या आदेशाचा भंग करणे समावेश आहे. गुन्हयात जामीन मिळाल्यानंतर विशाल पुन्हा गुन्हे करत होता. मुलीच्या हत्येपूर्वी तो जामिनावर बाहेर आला. त्यानंतर त्याने हे कृत्य केले होते. दरम्यान विशालचे तीन भाऊ शाम, नवनाथ, आकाश गवळी हे सराईत गुन्हेगार होते. त्यांना कोळसेवाडी पोलिसांनी चार महिन्यापूर्वी ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यातून तडीपार केले आहे.
घटनेचा संपूर्ण घटनाक्रम
23 तारखेला संध्याकाळी कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते.
आईकडून वीस रुपये घेऊन अल्पवयीन मुलगी खाऊ आणण्यासाठी दुकानात गेली होती.
अल्पवयीन मुलगी परत न आल्याने कु टुंबाने मुलीचा शोध सुरू केला.
मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार कोळसेवाडी पोलिस ठाण्यात केली.
24 डिसेंबर रोजी मुलीचा मृतदेह कल्याणनजीक बापगाव परिसरात सापडला.
मुलीच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात पाठवण्यात आला.
शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाले की मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली.
पोलिसांच्या तपासात मुख्य आरोपी विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीचे ही नाव समोर आले आहे.
विशाल गवळी याच्या पत्नीला ही पोलिसांनी ताब्यात घेतले.
घटनेच्या विरोधात नागरिकांनी निषेध मोर्चा काढला.
आरोपी विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली.
विशाल गवळी याला त्याच्या पत्नीच्या गावातून शेगाव येथून पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
-----------------------------------------------------