नवी दिल्ली : (Udit Raj Reaction on Tahawwur Rana) २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील प्रमुख आरोपी तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणावर काँग्रेस नेते उदित राज यांनी शंका व्यक्त केली आहे, त्याला 'खेळ' असे संबोधले आहे आणि त्याच्या हल्ल्यातील सहभागाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे विधान केले आहे.
यूपीए सरकारने डेव्हिड हेडलीला ठरवलं होतं मुख्य सूत्रधार - उदित राज
मुंबई २६/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला अमेरिकेतून भारतात आणण्यात आले आहे, परंतु काँग्रेस नेते उदित राज यांनी या सगळ्याला 'खेळ' म्हटले आहे. उदित राज म्हणाले की, "२०११ मध्ये यूपीए सरकारने तपासाची फाईल अमेरिकेला सोपवली होती, तेव्हा मनमोहन सिंग यांचे सरकार होते, त्या फाईलमध्ये मुख्य आरोपी म्हणून हेडलीचे नाव होते. त्यांनी हेडलीला आणले नाही? राणा हा कट रचणारा होता, पण त्याची भूमिका तितकी मोठी नव्हती."
तहव्वुर राणा सध्या एनआयएच्या ताब्यात आहे. भारतात आणल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले, त्यानंतर न्यायालयाने त्याला १८ दिवसांसाठी एनआयए कोठडीत पाठवले. दरम्यान, दिल्लीतील एनआयए मुख्यालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील त्याच्या सहभागासंदर्भात एजन्सी चौकशी वाढवण्याची अपेक्षा आहे.