"पालिका निवडणूक जवळ आल्यावर काहीजणांना...."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खोचक टीका

12 Apr 2025 11:58:43
 
Eknath Shinde
 
मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आल्यावर काहीजणांना मुंबईकरांची आठवण येते, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. शुक्रवार, ११ एप्रिल रोजी मुंबईतील विविध राजकीय पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते.
 
मुंबईतील उबाठा गट, काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, आरपीआय, लोक जनशक्ती पार्टी तसेच बंजारा समाजाचे अनेक पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुक्तागिरी निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी शिवसेना महिला नेत्या मीना कांबळी, आमदार प्रा. मनीषा कायंदे, ज्येष्ठ माजी नगरसेवक राम रेपाळे, माजी नगरसेवक पांडुरंग पाटील तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
शिवसेनेत प्रवेश केलेल्यांमध्ये दक्षिण मुंबई, अणुशक्ती नगर, चेंबूर, विक्रोळी, गोरेगाव आरे कॉलनीतील आदिवासी आणि पारधी बांधव, उबाठा गटाचे रवी आचारी, शिवसेना झोपडपट्टी महासंघाचे अध्यक्ष सुमीत वजाळे यांचा समावेश आहे. यासोबतच मनसेचे सतीश यादव, मुश्ताक शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते, आरपीआयचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य बाळासाहेब पगारे, बापू जगदने, लोक जनशक्ती पार्टी मुंबई अध्यक्ष किरण माने, मुंबई संपर्कप्रमुख अखिलेश राव, प्रफुल पवार, सुंदर पाटील, तुषार खानोलकर, युवराज पाटील, कैलास सोलंकी यांचाही समावेश आहे.
 
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आल्यावर काही जणांना मुंबईकरांची आठवण येते. मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मुंबई वेगळी करणार अशी जुनी कॅसेट त्यांच्याकडून वाजवली जाते. पण महायुती सरकारने सर्वसामान्य मुंबईकरांचे रखडलेले पुनर्विकास प्रकल्प सहा शासकीय संस्था एकत्रित करून पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत," असे ते म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0