...म्हणूनच छत्रपती शिवराय आमचे दैवत! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

    12-Apr-2025
Total Views |
 
Devendra Fadanvis
 
रायगड : छत्रपती शिवराय नसते तर तुम्ही आम्ही कुणीच इथे नसतो. म्हणूनच छत्रपती शिवराय आमचे दैवत आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, १२ एप्रिल रोजी केले. राजसभा, रायगड किल्ला येथे आयोजित कार्यक्रमास ते बोलत होते. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासादार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "ज्यावेळी संपूर्ण हिंदुस्तानात मोगलाई, कुतुबशाही आणि आदिलशाही होती, देशातील राजे आणि राजवाडे मोडकळीस येत होते. एक अंधकार तयार झाला होता आणि कधीच पहाट होणार नाही असे वाटत होते. त्यावेळी आई जिजाऊंच्या आशीर्वादाने छत्रपती शिवरायांसारखा एक तेजस्वी सूर्य उगवला आणि त्या सुर्याने आपल्याला स्वराज्याची पहाट दाखवली. छत्रपती नसते तर तुम्ही आम्ही कुणीच इथे नसतो. म्हणूनच छत्रपती शिवराय आमचे दैवत आहेत. त्यांच्यामुळेच आज आम्ही स्वातंत्र्यात असून देव, देश आणि धर्माचे कार्य करू शकत आहोत. आमच्यातील ते तेज जागृत करण्याचे काम छत्रपतींनी केले. छत्रपतींनी अठरापगड जातीच्या लोकांना एकत्रित करून त्यांच्यातील पौरुष जागृत केले. त्या सामान्य मावळ्यांना वीरांमध्ये परिवर्तित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवरायांमुळेच दिल्लीपासून अटकेपर्यंत भगवा झेंडा लागला. केवळ त्याच्यामुळेच संपूर्ण भारतावर भगव्याचा अमल आला," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  "रोज सामनाच्या अग्रलेखात आणि ट्विटरवर..."; केशव उपाध्ये यांचा संजय राऊतांवर घणाघात
 
दिल्लीत शिवरायांचे राष्ट्रीय स्मारक तयार करणार
 
"उदयनराजे भोसले यांच्या मागण्यांवर योग्य कारवाया करणार आहोत. छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरूनच लोटून दिले पाहिजे, असे आमचे सर्वांचेच मत आहे. पण आपण लोकशाहीमध्ये आहोत. त्यामुळे लोकशाही अनुरुप नियम तयार करण्याचे काम आपण करु. त्यासोबतच छत्रपतींचा प्रमाण इतिहास राज्य सरकारच्या वतीने तयार करण्याचे काम हातात घेऊ. अरबी समुद्रातील स्मारकाबाबत हायकोर्टात लढून ते मोकळे करून घेऊ. कुठल्याही परिस्थितीत छत्रपती शिवरायांचे हे स्मारक तयार व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येईल. दिल्लीतसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे एक राष्ट्रीय स्मारक व्हावे. त्यासाठी अमित शाह यांच्या मदतीने आम्ही योग्य जागेवर हे स्मारक तयार करणार आहोत. महाराष्ट्रातील सरकार छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने चालणारे सरकार आहे. छत्रपतींचा आदर्श आणि भारताचे संविधान या दोनच गोष्टींवर आधारावर आमचे सरकार काम करेल," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
 
अमित शाह मराठा इतिहासाचे एक संशोधक
 
"भारताचे गृहमंत्री अमितभाई शाह यांनी छत्रपती शिवरायांच्या आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा गाढा अभ्यास केला. जगभरातून इतिहासाचे पुरावे मिळवून हा इतिहास समजून घेतला आणि त्याचे वाचन आणि लेखन दोन्ही केले. अमित शाह आज केवळ गृहमंत्री म्हणून इथे आलेले नाहीत तर छत्रपती शिवरायांचे सेवक म्हणून आणि मराठा इतिहासाचे एक संशोधक म्हणून इथे आले आहेत," असेही ते यावेळी म्हणाले.