पुणे शहरापासून सुमारे ९० किमी अंतरावर असलेले जुन्नर हे मानव-बिबट्या संघर्षासाठी अनेकदा चर्चेत असते. जुन्नर मधील उसाची शेती ही बिबट्यांसाठी एक परिपूर्ण आश्रयस्थान आहे. शिवाय, येथील पशुधनाची शिकार करण्यासाठी देखील बिबटे सहजपणे गावात वावरताना दिसतात. याठिकाणी 'डब्लूआयआय'चे संशोधक २०१९ पासून बिबट्यांंवर संशोधनाचे काम करत आहेत. यासाठी 'डब्लूआयआय' आणि वन विभागामध्ये सामंजस्य करार झाला आहे. या कराराअंतर्गत 'डब्लूआयआय'चे संशोधक बिबट्यांना रेडिओ काॅलरिंग करुन त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यावर अभ्यास करत आहेत. याअंतर्गत तीन महिन्यांपूर्वी 'डब्लूआयआय'चे वरिष्ठ संशोधक डाॅ. बिलाल हबीब यांच्या मार्गदर्शनाखाली एका बिबट्याला कॅमेरा असणारा रेडिओ काॅलर लावण्यात आला होता. एकूण १४ बिबट्यांना रेडिओ काॅलर करण्यात आले होते, त्यामधील एका बिबट्याला कॅमेरा असणारा रेडिओ काॅलर लावण्यात आला आहे. त्यामधून मिळालेले छायाचित्रण पहिल्यांदाच बिलाल यांनी प्रसिद्ध केले आहे.
याविषयी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना बिलाल यांनी सांगितले की, "बिबट्याच्या गळ्यात कॅमेरा असणारा रेडिओ काॅलर आम्ही प्रायोगिक तत्वावार बसवला आहे. बिबट्याच्या गळ्यातील कॅमेरा असणारा रेडिओ काॅलर दिवसभर कार्यान्वित नसतो. सद्यपरिस्थितीत हा कॅमेरा तासाला केवळ ३० सेकंदासाठीच कार्यान्वित होतो आणि छायाचित्रण करुन ते आम्हाला पाठवतो. वेळीची ही मर्यादा आम्ही ठरवत असल्यामुळे त्यामध्ये कमी-अधिक प्रमाण करता येऊ शकते." अशा पद्धतीने कॅमेरा असणारे रेडिओ काॅलर एखाद्या वन्यजीवाला बसवण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच वेळ आहे. अशा पद्धतीच्या उपकरणामुळे वन्यजीवांची हालचाल टिपता येईलच सोबत त्याच्या वर्तनाचा सूक्ष्म अभ्यासही करता येईल. महत्त्वाचे म्हणजे मानव-वन्यजीव संघर्षामध्ये अशा प्रकारची उपकरणे महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.