मुंबई : मुंबई मराठी साहित्य संघातर्फे ' निवडक जयवंत दळवी ' या कार्यक्रमात दिवंगत लेखक, पत्रकार जयवंत दळवी यांच्या साहित्याचा स्मृतीजागर पार पडला. गिरगावच्या साहित्य संघ मंदिरात जयवंत दळवी यांच्या साहित्याच्याअभिवाचनचा कार्यक्रम संपन्न झाला. दिग्गज लेखक तथा नाट्यकर्मींच्या उपस्थिती मध्ये हा साहित्य सोहळा संपन्न झाला.
मराठी साहित्य विश्वातील सुवर्णपर्व म्हणून ओळखले जाणाऱ्या जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिम्मित आयोजन करण्यात आलेल्या ' निवडक जयवंत दळवी ' या कार्यक्रमात जयवंत दळवी यांच्या विवधांगी साहित्याचा आढावा घेण्यात आला. या कार्यक्रमात ज्येष्ठ लेखिका प्रतिभा सराफ यांनी ' सारे प्रवासी घडीचे ' या पुस्तकातील एक प्रकरण सादर केले. बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांनी स्वप्नरेखा या त्यांच्या कथासंग्रहातील 'चिमण' ही कथा सादर केली. किर्ती महाविद्यालयातील मराठी भाषा विभागाच्या प्रमुख प्रतिभा बिस्वास यांनी निवडक ठणठणपाळ मधील एक उतारा सादर केला. ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार यांनी 'सूर्यास्त' या नाटकातील एका प्रसंगाचे अभिवाचन केले. प्रख्यात अभिनेत्री शकुंतला नरे आणि जेष्ठ अभिनेते उपेंद्र दाते यांनी ' संध्या छाया ' या नाटकाचे अभिवाचन केले. साहित्य अकादमीचे केंद्रीय सदस्य नरेंद्र पाठक यांनी जयवंत दळवी यांच्या आयुष्यातील काही संस्मरणीय आठवणींना उजाळा दिला. यावेळी मुंबई मराठी साहित्य संघाच्या प्रमुख कार्यवाह अश्विनी भालेराव यांनी ग्रंथभेट देऊन मान्यवरांचे स्वागत केले तसेच सादरकर्त्यांचे कौतुक देखील केले.