मुंबई : अमेरिकेकडून आयातशुल्कवाढीला स्थगिती दिल्यामुळे शेअर बाजारात शुक्रवारी आनंदीआनंद पसरला. तब्बल १३०० अंशांच्या उसळीसह सेन्सेक्सने ७५ हजारांचा टप्पा ओलांडला. यामुळे गुंतवणुकदारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. निफ्टीमध्येही ४२९ अंशांची जोरदार वाढ होत २२,८२८ अंशांचा टप्पा निर्देशांकाने गाठला. या आठवड्याच्या सुरुवातीलाच बसलेल्या जोरदार दणक्यातून शेअर बाजार सावरतोय हेच चित्र शुक्रवारी दिसले. सर्वच क्षेत्रांमध्ये वाढ दिसली.
सोमवारी जोरदार नुकसानीचा दिवस बघणाऱ्या टाटा स्टील कंपनीचे शेअर्स शुक्रवारी वधारले. याबरोबरच पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन, एनटीपीसी, महिंद्रा अँड महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांचे शेअर्स वधारले. याउलट एशियन पेंट्स, टाटा कन्सलटन्सी सर्व्हीसेस या कंपन्यांच्या शेअर्समध्ये आश्चर्यकारक घसरण झाली.
शेअर बाजारातील या चढाईमागे अमेरिकेकडून आयातशुल्कास दिली गेलेली स्थगिती हे कारण असले तरी त्याचबरोबरीने भारतासाठी निर्माण होणाऱ्या संधी हेही महत्वाचे कारण आहे. असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता शेअर बाजार पूर्वपदावर येतो आहे याचेच हे निदर्शक आहे. असेही मत तज्ज्ञांनी नोंदवले आहे.