माधवाचा सृजनस्वर

    11-Apr-2025
Total Views |
 
Madhav Dixit
 
कला माणसाला केवळ सजवत नाही, तर त्याला घडवतही असते. अशाच एक कलाकार असलेल्या माधव दिक्षित यांच्याविषयी...
 
मानवी जीवनात कला ही केवळ एक अभिव्यक्ती नाही, तर ती आत्म्याचा श्वास आहे. जसा फुलांना रंग आणि गंध असतो, तशीच जीवनाला अर्थ आणि सौंदर्य देणारी शक्ती म्हणजे कला! चित्रकाराचे ब्रश जेव्हा कॅनव्हासवर मुक्तसंचार करतात, तेव्हा त्याच्या मनातली कहाणीच रंगांतून चितारते. नर्तकाच्या पावलांतून त्याच्या भावनांची लय साकार होते. एखादे गाणं ऐकून डोळ्यांत पाणी येणे, ही केवळ भावना नाही, तर ती आत्म्याशी झालेल्या संवादाची अनुभूतीच. कला मानवाला नवे दृष्टिकोन देते, संवेदनशील बनवते. कला केवळ सौंदर्य नसून, जीवनातील गूढतेला समजून घेण्याचा एक मार्ग आहे. म्हणूनच, कला माणसाला केवळ सजवत नाही, तर त्याला घडवतही असते. अशाच एक कलाकार माधव दिक्षित यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊया.
 
माधव यांचा जन्म टिटवाळ्याचा. माधव यांचे वडील टिटवाळ्यातील पहिले डॉक्टर. अर्थात रा. स्व. संघाचे संस्कार त्यांच्या वडिलांवर असल्याने, डॉक्टरी हे जनसेवेचे माध्यम होते. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या माधव यांनी वैद्यक क्षेत्रात काही करावे, अशी त्यांच्या वडिलांची अपेक्षा. मात्र, माधव यांचा प्रारंभीपासूनच ओढा कलेकडे होता. वडिलांच्या मार्गदर्शनानुसार वैद्यकीय शिक्षणाला प्रवेश मिळवला. मात्र, यासाठी त्यांना घर सोडावे लागले. परंतु, काही कारणास्तव एकाच वर्षात त्यांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुणे, नाशिक इथे माधव यांच्या वडिलांनी प्रयत्न केले.
 
मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. त्यावेळी माधव यांनी वडिलांना त्यांच्या इच्छेविषयी सांगितले. त्यामुळे वडील काहीसे नाराज झाले; तरी मुलांनी त्यांना हवे तेच केले पाहिजे, हे तत्त्व जपले. त्यामुळे माधव यांचा आत्मशोध नव्याने सुरू झाला. या काळात वरळी येथील ‘श्रमिक विद्यापीठा’त माधव यांनी चित्र, ‘टेक्सटाईल डिझाईन’ यांसारखे अनेक कोर्स केले. माधव यांचे आजोबा उत्तम मूर्तिकार होते, तसेच माधव यांचे वडीलही मूर्ती घडवत असत.
 
त्यामुळे कला ही वडिलोपार्जित देणगी माधव यांच्याकडे होतीच. या शिक्षणाने त्यांना पैलू पाडण्याचे काम केले. माधव यांच्या नक्षीला मान्यता आणि मागणी आलेली पाहून, त्यांच्या मार्गदर्शकांनी ‘टेक्सटाईल अभियांत्रिकी’ करण्याचा सल्ला दिला. यावर घरी विचारले असता, “हवे ते करा. मात्र, अपयश आल्यास घरी पाऊल ठेवू नका,” असे काहीसे बजावण्यात आले. त्यामुळे माधव यांच्याकडे हे शिक्षण पूर्ण करण्यावाचून पर्याय नव्हताच. पहिल्याच दिवशी त्यांना समजले होते की, ‘टेक्सटाईल डिझाईन’ आणि ‘टेक्सटाईल अभियांत्रिकी’ ही दोन भिन्न क्षेत्रे आहेत. पण, आता पर्याय कुठे? या विचाराने माधव यांनी तिन्ही वर्षांत उत्तम गुणांनी हे शिक्षण पूर्ण केले.
 
शेवटच्या वर्षाला असताना माधव रेल्वेची परीक्षा उत्तीर्ण झाले व त्यांना रेल्वेमध्ये नोकरीदेखील लागली. त्यामुळे हे छंद वगैरे सगळेच मागे पडल्याचे माधव सांगतात.पुढे विवाहानंतर स्थिरस्थावर झाल्यावर माधव यांच्यातील कलाकाराला जागे करण्यात त्यांच्या पत्नीचा मोलाचा वाटा असल्याचे ते सांगतात. विवाहानंतर माधव यांनी संसाराबरोबर कला जोपासावी, असा त्यांच्या पत्नीचा हट्टच होता व त्यासाठी त्यांनी भक्कम पाठिंबादेखील दिला. माधव यांच्या पत्नी टिटवाळा येथील माधव यांच्या शाळेमध्येच मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
 
कला जोपासण्यासाठी माधव यांनी विविध ठिकाणांहून चित्रकलेतील गोष्टी शिकत छंद वाढवला. नोकरीनिमित्ताने प्रशिक्षणाला असताना, माधव यांनी काव्यलेखनास सुरुवात केली. अर्थात, पत्नीचा रुसवा काढण्याची ही शक्कलच होती. मात्र, हे लेखन आवडल्याने ते कायम सुरू ठेवण्याचा सल्लादेखील पत्नीने त्यांना दिला व तो त्यांनी ऐकलाही!
आजमितीला माधव यांनी 100 गझल लिहिल्या असून, काही मराठी मालिकांसाठीही गीत लिहिण्याचे कार्य माधव यांनी केले आहे. ‘माझ्या क्षणिका’ नामक काव्यसंग्रह माधव यांनी लिहिला असून, ‘बंध सारे रेशमांचे’ हा म्युझिक अल्बमही त्यांचाच आहे.
 
त्याचप्रमाणे, माधव यांनी प्रवासवर्णनेदेखील लिहिली आहेत. माधव यांची दोन फोटोग्राफीची प्रदर्शने भरली असून, यांना वन्यजीव, निसर्ग, ‘पोर्टेट फोटोग्राफी’ची विशेष आवड आहे. ताज हॉटेलमध्ये माधव यांच्या चित्रांचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते. माधव यांचे एक चित्र युकेमधूनही खरेदी करण्यात आले. कोणत्याही कलेला आत्मानंदासाठी आत्मसात करण्याची वृत्तीच माधव यांच्या यशाचे सार आहे. हे सगळे छंद ते रेल्वेतील नोकरी सांभाळून करतात, हे विशेष. सध्या माधव भारतीय रेल्वेमध्ये ‘ट्रेन मॅनेजर’ या पदावर कार्यरत आहेत.
 
माधव यांच्या कलेचा वारसा त्यांच्या पुढील पिढीमध्ये उतरला असून, त्यांच्या कन्या एक उत्तम सिरेमिक कलाकार आहेत. त्यांच्या अनेक कलाकृती मुंबईतील ‘काळा घोडा’ प्रदर्शनात लोकप्रिय झाल्या होत्या. सध्या त्यांनी हडप्पा-मोहेंजोदारोच्या प्रतिकृती तयार करण्याचे कार्य हाती घेतले असून, हरियाणा सरकारने या प्रतिकृती विकत घेतल्या आहेत. माधव यांनी त्यांच्या कन्येकडूनदेखील ही कला शिकली असून, त्यांच्या कामातही ते आवश्यकतेनुसार त्यांना सहकार्य करतात. माधव यांना अनेक कला शिकण्याची इच्छा आहे. त्यांच्या पुढील देदीप्यमान प्रवासासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून मनःपूर्वक शुभेच्छा!
 
कौस्तुभ वीरकर