राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक व महाराष्ट्र प्रांत बौद्धिक प्रमुख म्हणून प्रदीर्घकाळ दायित्व निभावलेल्या स्व. नानाराव ढोबळे यांच्या जीवनचरित्राचा आढावा घेणारा स्वर्गीय नानाराव ढोबळे विशेषांक ‘एकता मासिक, पुणे’ने प्रसिद्ध केला आहे. सदर विशेषांकाचे प्रकाशन प्रा. प्रकाश पाठक यांच्या हस्ते आज, दि. 11 एप्रिल रोजी, स्व. नानाराव ढोबळे सभागृह, शंकराचार्य संकुल, गंगापूर रोड, नाशिक येथे संपन्न होणार आहे. त्यानिमित्ताने स्व. नानाराव ढोबळे यांच्या स्मृतींना उजाळा देणारा हा विशेष लेख...
साधारण 1962-63 सालच्या सुमारास, धुळ्याची तानाजी सायं शाखा प्रार्थना विकिर झाले. नानाच्या भोवती आम्हा बालस्वयंसेवकांनी गराडा घातला. प्रवासात नाना सायं शाखेवर आवर्जून येत. संवाद साधत.
नुकतेच इस्रायली वैमानिकांनी मोठे सैनिकी ऑपरेशन यशस्वी करून आपल्या नागरिकांची सुटका केली होती. नाना म्हणाले, “आपला देश असा पराक्रम कधी करेल, जेणेकरून आमच्याकडे कुणीही वाकडी नजर करून पाहू शकणार नाही आणि पाहिलच, तर शत्रूचे डोळे फोडू.” नानांचा स्वर कातर झाला. नाना जवळ घेत डोक्यावर हात फिरवीत मला म्हणाले, “बंशा, एक दिवस येईल निश्चित!” आम्हा बालस्वयंसेवकांना त्यांची भावना, व्यथा कळली. ज्ञानेश्वर माऊली म्हणते तसे,
हृदया हृदय एक जाले
ये हृदयीचे ते हृदयी घातले
द्वैत न मोडीता केले
आपणा ऐसे अर्जुना॥
नाना नकळत मनाला साद घालत. मला ते काहीवेळी ‘बंशा’ म्हणत. मी भाग्यवान अशासाठी होतो, मला त्यांचा सहवास लहानपणापासून लाभला.
माझे वडील स्व. गोविंदशास्त्री जोशी धुळे जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते होते. नानांच्या प्रवासात दोंडाईचा येथे आमच्या घरी त्यांचे हमखास येणे होत असे. त्यावेळी धुळे जिल्हा मध्यवर्ती असल्याने प्रवासात त्यावेळच्या अपुर्या साधनांमुळे सोईचे होई. दुटांगी पांढरे धोतर, बाह्या दुमाडलेल्या, पांढरा लांब बाह्यांचा सदरा, पायात चप्पल, कपाळी अष्टगंधाचा टिळा आणि प्रसन्न मुद्रा असलेले नाना, आमच्या धुळे जिल्ह्याचे प्रचारक होते.
नंतर ते नाशिक विभागाचे प्रचारक होते. प्रांत बौद्धिक प्रमुख झाल्यावरसुद्धा त्यांचा आमच्यासोबत संपर्क टिकून होता. नानांना समाजातल्या वंचित आदिवासी घटकांप्रति विलक्षण तळमळ होती. धुळे जिल्ह्याचा निम्मा भाग आदिवासीबहुल होता. त्याकाळी दळणवळणाची साधने अपुरी होती. धडगाव, अक्कलकुवा भागात तर मैलोन्मैल पायी प्रवास करावा लागत असे.
जिल्ह्याच्या मैदानी तालुक्यात (सिंदखेड, धुळे, शिरपूर, साक्री) भिल्ल वस्ती जास्त होती. भूमिहीन, मोलमजुरी किंवा शेती आणि गुराची देखभाल करून प्रपंच चालवणारी ही भटकी मंडळी शरीराने काटक, मैलोन्मैल धावू शकणारी होती. थोडी स्वच्छंदी स्वभाव असलेली होती. त्यामुळे प्रत्यक्ष शेतीव्यवसाय करीत नसत. थोडी शेती असलेल्या काही भिल्ल कुटुंबांना नानांनी एकत्र केले. त्यांना शेती अवजारे, बैलजोडी, खते दिली.
विहिरीवर पाण्यासाठी मोटार व इंजिनची सोय उपलब्ध करून त्यांनी सहकारी पद्धतीने शेती करावी, अशी योजना केली. अक्कल्कोस गावी हा प्रकल्प बरीच वर्षे चालू होता. कांदा वगैरेसारखी नगदी पिके घ्यायला सुरुवात झाली होती. त्याच्या सर्व आवश्यकता पूर्ण करण्यासाठी नाना जिवाचे रान करीत. मोरोपंत पिंगळे हे या प्रकल्पातून वर आल्याचे स्मरते. गोविंदराव पूर्णपत्रे आणि माधव बंडू मोरे हे पूर्ण वेळ कार्यकर्ते होते.
घार हिंडते आकाशी
पण चित्त तिचे बाळापाशी॥
नाना कुठेही असले, तरी आदिवासी भागातल्या स्वयंसेवकांकडे नानांचे मातृहृदय सतत लक्ष ठेवून असे. प्रत्येकाच्या घरची परिस्थिती आणि त्यावर उपाययोजनेसाठी नाना अखंड धडपड करीत. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, विवाह अशा सर्व गोष्टींची नोंद ते ठेवत.
नानांचे वक्तृत्व हे लिहिण्यापेक्षा अनुभवण्याचा विषय आहे. एक तरी ओवी अनुभवावी, त्याप्रमाणे एक तरी बौद्धिक वर्ग अनुभवावा. अंतःकरणापासून निघणारा देश भक्तीने ओतप्रोत भरलेला प्रत्येक शब्द मनाचा ठाव घेत भारून टाकत असे. प्रत्यक्ष जीवनातल्या उदाहरणांची पेरणी, वैचारिक समृद्धीत भर घालत असे. करुणा हा त्यांच्या अमोघ वाणीचा स्थायी भाव होता. परम वैभवाचा फुलोरा तेवढ्याच आनंदाने फुलवत असत. तरुणांना विशेष आकर्षित करेल नव्हे तर कार्यप्रवण करेल, असे सामर्थ्य नानांच्या वाणीत होते. श्रोत्यांच्या हृदयाशी नाना सहज संवाद साधत. माझ्या वडिलांशी ते अखंड पत्रव्यवहार करीत. ‘परम मित्र’ने सुरू झालेले पत्र ‘तत्रस्थ स्वयंसेवक बंधूस नमस्कार,’ घरातील सर्वांचा स्मरणपूर्वक उल्लेख करीत.
जिल्ह्याची बैठक दोंडाईचाला ठरली होती. माझे वडील जिल्हा बौद्धिक प्रमुख होते. तशी पत्र नानांनी सर्वांना धाडली होती आणि अचानक आणीबाणी जाहीर झाली आणि वडिलांना रात्री अटक झाली. तिसर्या दिवशी ठावठिकाणा कळल्यावर भेटायला गेलो. वडील म्हणाले, “त्वरित घरी जा. नानांच्या हस्ताक्षरात काही पत्रे आणि बैठकीचा तपशील आहे तो जाळून टाक.” आणीबाणी काळात नानांनी त्यांचा प्रवास चालू ठेवला होता. धुळ्याला केशव नांदेडकरच्या घरी भेट झाली. पायावर डोके ठेवून मन मोकळ केले. नानांनी आईची व सर्वांची विचारपूस केली. त्यांचे दर्शन ऊर्जा देत असे.आधार वाटत असे.
आम्हा मिसाबंदींच्या कुटुंबांना पाठीवर हात ठेवून लढ म्हणणार्या या ऊर्जेची खूप गरज असायची. कारण, बंदीवासाची मुदत ठरलेली नव्हती आणि रोज अत्याचाराच्या बातम्या येत असत. आणीबाणीनंतर धुळ्याला आले असताना छाया सोनवणे बेल पाठक (रवी बेलपाठक)च्या घरी प्रकृती बरी नसतानाही आवर्जून गेल्याचे आठवते. मी पुण्याला गेलो की, मोतीबागेत भेटायला जात असे. अनेक वर्षांचा टाचेचे दुखणे आणि अन्य प्रकृती अस्वास्थ्य मागे लागली होती. तरीही समाज तळातल्या मोत्यांचा शोध चालू होता.
बरीच वर्षे खानदेशात असल्याने कुटुंबातल्या, गावातल्या सर्वांची विचारपूस करीत. माऊलीच्या प्रेमाने माझ्या पिढीच्या कार्यकर्त्यांना चिंब भिजवून, आपल्या कातर प्रेरणादायी गंगेत पवित्र करून, प्रत्यक्ष वर्षानुवर्षे संघ कार्यासाठी पाथेय देऊन आमची माऊली अनंताच्या प्रवासाला गेली.
हृदया हृदय एक जाले,
ये हृदयीचे ते हृदयी घातले,
द्वैत न मोडीता केले,
आपणा ऐसे अर्जुना॥
बन्सी जोशी
(लेखक नाशिकचे पूर्व जिल्हा कार्यवाह आहेत.)