जागतिक उलथापालथींच्या काळात भारत एकच आशेचा किरण आहे – आशिषकुमार चौहान

11 Apr 2025 12:38:42
chauhan
 
 
मुंबई : “सध्याच्या जागतिक अर्थकारणातील उलथापालथींच्या काळात भारत हा एकच आशेचा किरण उरला आहे” अशा शब्दांत राष्ट्रीय शेअर बाजारा म्हणजे एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान यांनी मांडले. भारताच्या भविष्याचा वेध घेणारी इंडिया ग्लोबल फोरम मुंबईत संपन्न झाली. या परिषदेत आशिषकुमार चौहान संबोधित करत होते. या परिषदेत भारताच्या भविष्यातील पुढच्या २५ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेण्यात आला.
 
भारतातील भांडवली बाजार हा सध्या सातत्याने तेजी – मंदीच्या हिंदोळ्यांतून जात असला तरी त्यातूनही तरीही भविष्यात भारतीय बाजार सावरण्याच्या दृष्टीने पावले टाकत आहे. तरीही भारताने आपली भांडवल निर्मितीची क्षमता ५ ट्रिलियन डॉलर्सवर नेलेली आहे. त्यामुळे भारत आता आपल्या एकूणच सर्वच क्षेत्रातील क्षमतावृध्दीकडे वाटचाल करतो आहे. त्यातून आता भारताची वृध्दी होत आहे. सध्या अमेरिकेकडून लादण्यात आलेल्या आयातशुल्काने जागतिक अर्थकारण ढवळून निघालेले असले तरी भारताकडे याही परिस्थितीत आपली निर्यात शाबूत ठेवत काम करण्याची क्षमता आहे याकडे आशिषकुमार चौहान यांनी लक्ष वेधले.
 
आज भारतात सर्वसामान्यांचाही गुंतवणुकीकडे कल वाढतोय, यामध्ये एसआयपीचा वाटा जास्त आहे. भारतीय आज महिन्याला किमान २५० रुपये तरी एसआयपीमध्ये गुंतवतात. त्यामुळे महिन्याला २.५ ते ३ बिलियन रुपये गुंतवणुक होते. यामुळे भारतीय बाजारावरील गुंतवणुकदारांचा विश्वास वाढतोय याचेच ते निदर्शक आहे, असे निरीक्षण चौहान यांनी नोंदवले.
 
आपल्या भाषणाच्या शेवटी चौहान यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या मजबूत स्थितीकडे लक्ष वेधले. भारत या सगळ्या उलथापालथींमध्येही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान टिकवून ठेवू शकलाय याच गोष्टी भारताच्या विकासाचे इंगित आहे. त्यामुळे देशी – परदेशी गुंतवणुकदारांसाठी भारत हाच एक महत्वाचा हॉटस्पॉट आहे, असा ठाम विश्वास चौहान यांनी व्यक्त केला.
 
 
Powered By Sangraha 9.0