द्रमुक सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात भाजप अद्रमुक एकत्र लढणार - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घोषणा, युतीवर शिक्कामोर्तब
11-Apr-2025
Total Views |
नवी दिल्ली (Amit Shah) : तामिळनाडूमधील द्रमुक सरकारचे कुशासन आणि भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी भाजप आणि अद्रमुक एकत्र आले असून अतिशय भक्कम युती करण्यात आली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी चेन्नई येथे केले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या चेन्न्ई दौऱ्यामध्ये महत्त्वाची घडामोड घडली आहे. तामिळनाडूच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने अण्णाद्रमुक पक्षासोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अद्रमुकचे प्रमुख ई. के. पलानीस्वामी यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकारपरिषदेत याची घोषणा केली.
पत्रकारपरिषदेत अमित शाह म्हणाले, २०२६ मध्ये होणाऱ्या तामिळनाडू विधानसभा निवडणुका प्रमुख एडाप्पाडी पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील. जागांचे वाटप चर्चेनंतर नंतर ठरवले जाईल. अद्रमुकच्या युतीबाबत कोणतीही मागणी किंवा अटी नाहीत. अद्रमुकचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (रालोआ) सामील होणे दोघांसाठीही उपयुक्त आहे. पुढील निवडणूक द्रमुक सरकारच्या भ्रष्टाचार, दलित आणि महिलांवरील अत्याचारांच्या आधारावर लढवली जाईल. लोक घोटाळ्यांबद्दल द्रमुककडून उत्तरे मागत आहेत, ते निवडणुकीत या मुद्द्यांवर मतदान करतील, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला.
येत्या काळात होणाऱ्या निवडणुकीत रालोआला पुन्हा एकदा प्रचंड बहुमत मिळेल आणि तामिळनाडूमध्ये पुन्हा एकदा रालोआ सरकार स्थापन होईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला. द्रमुक सरकारवर निशाणा साधताना ते म्हणाले की, द्रमुकचे नेते लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी नीट आणि सीमांकनाचा मुद्दा उपस्थित करत आहेत. त्याचप्रमाणे सनातन धर्मास विरोध करणे हादेखील त्याचाच भाग आहे. त्यामुळे आता जनताच द्रमुकला जागा दाखवेल, असेही केंद्रीय गृहमंत्री शाह यावेळी म्हणाले.
भाजप प्रदेशाध्यक्षपदी नैनर नागेंथिरन यांची निवड जवळपास निश्चित
तामिळनाडू भाजपचे उपाध्यक्ष नैनर नागेंथिरन यांनी तामिळनाडूच्या प्रदेशाध्यक्षपदी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या पदासाठी अर्ज दाखल करणारे नैनर नागेंथिरन हे एकमेव उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांच्या निवडीची औपचारिकताच आता बाकी आहे. याविषयी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, तामिळनाडू भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी फक्त नैनर नागेंथिरन यांच्याकडूनच नामांकन प्राप्त झाले आहे. तामिळनाडू भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून के. अण्णामलाई यांनी प्रशंसनीय कामगिरी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांना लोकांपर्यंत पोहोचवणे असो किंवा पक्षाचे प्रकल्प गावोगावी पोहोचवणे असो, अन्नामलाई यांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे पक्षाच्या राष्ट्रीय रचनेत अण्णामलाई यांच्या संघटनात्मक कौशल्यांचा भाजप वापर करे, असेही ते म्हणाले.