"पश्चिम बंगालमध्ये वक्फ विधेयक लागू होणार नाही", ममता बॅनर्जींकडून वक्फ मालमत्तेचे रक्षण करण्याचे आश्वासन; म्हणाल्या, “"मी इथे असेपर्यंत ...”

10 Apr 2025 11:21:12

mamata banerjee on waqf bill
 
कोलकाता : (Mamata Banerjee on Waqf Bill) गेल्याच आठवड्यात संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सभागृहांनी वक्फ सुधारणा विधेयक बहुमताने पारित केल्यानंतर शनिवार दि. ५ एप्रिल रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीदेखील विधेयकाला मंजुरी दिल्यामुळे त्याचे आता कायद्यात रुपांतर झाले आहे. अशात या कायद्याविरोधात पश्चिम बंगालमध्ये विशिष्ट समुदायातील धर्मांधाकडून हिंसक निदर्शने सुरु आहेत. राज्यात सुरू असलेल्या या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वक्फ कायद्याविरुद्ध आंदोलन करणाऱ्यांच्या समर्थनार्थ आपले मत व्यक्त केले आहे.
 
"मी इथे असेपर्यंत तुमचं आणि तुमच्या मालमत्तेचं रक्षण करेन"
 
बुधवारी कोलकात्यामध्ये जैन समुदायातर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना ममता बॅनर्जी यांनी वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात पक्षाची भूमिका मांडली आहे. वक्फ मालमत्तेचे रक्षण करण्याचे आश्वासन देताना "तुम्ही लक्षात ठेवा की मी इथे आहे तोपर्यंत तुमचं आणि तुमच्या मालमत्तेचं रक्षण करेन. आपण एकमेकांवर विश्वास ठेवायला हवा, असे विधान केले आहे. या विधेयकाला सुरुवातीपासून विरोध करणाऱ्या तृणमूल काँग्रेसनेही आता विरोधाची ठाम भूमिका घेतली आहे.
 
 
 
 
"वक्फ सुधारणा विधेयक मंजूरच व्हायला नको होतं"
 
मुर्शिदाबाद मध्ये वक्फ विधेयकावरून हिंसाचार झाल्याचं समोर आलं असून त्या घटनेचाही उल्लेख ममता बॅनर्जी यांनी केला आहे. "बांगलादेशच्या सीमाभागातील परिस्थिती तुम्ही पाहा, अश्या परिस्थितीत वक्फ सुधारणा विधेयक मंजूरच व्हायला नको होते. पश्चिम बंगालमध्ये ३३ टक्के - अल्पसंख्याक आहेत. मी त्यांचे काय करू?", असा सवाल ममता बॅनर्जीनी यावेळी उपस्थित केला.
 
वक्फ विधेयकाबाबत काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?
 
पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारणा विधेयक लागू होणार नसल्याचे स्पष्ट करत ममता बॅनर्जी यांनी म्हणाल्या, "मला कल्पना आहे की, वक्फ सुधारणा विधेयक संसदेत मंजूर झाल्यामुळे तुमच्या मनात असंतोषाची भावना आहे. पण बंगालमध्ये असे काहीही होणार नाही, ज्यातून 'फोडा आणि राज्य करा' धोरणातून एखादी व्यक्ती सत्ता गाजवेल. राजकीय उद्देशासाठी काही लोक तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करत असतील, पण त्यांच्या भडकवण्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा", असं आवाहनदेखील पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उपस्थितांना केले.
Powered By Sangraha 9.0