दशावतार जगणारा जंबूराक्षस

    10-Apr-2025
Total Views |
 
Swapnil Naik Dashavtar Sindhudurg Konkan
 
खाणकाम क्षेत्रात ट्रकचालक म्हणून झालेली सुरुवात ते दशावतारातील खलनायक म्हणून झालेली ओळख, असा वेंगुर्ल्याच्या स्वप्निल नाईक यांचा जीवनप्रवास...
 
कोकण म्हटले की दशावताराचे खेळ हे आलेच. कोकणातला हापूस जितका प्रसिद्ध, तितकाच दशावतारातील जंबूराक्षसही लोकप्रिय. सिंधुदुर्गात पाहिल्यास दशावताराची अनेक मंडळे सक्रिय आहेत. त्यांपैकी एक ‘दत्त माऊली दशावतार नाट्यमंडळ’ हे सिंधुदुर्गातील एक नामवंत मंडळ. याच मंडळात जंबूराक्षसाची भूमिका साकारणारे स्वप्निल नाईक. खाणकाम क्षेत्रात ट्रकचालक म्हणून झालेली सुरुवात ते आज संपूर्ण सिंधुदुर्गात ‘जंबूराक्षस’ म्हणजे स्वप्निल नाईक अशी खास ओळख तयार झालेली. आज 17 वर्षे ते दशावतार करत आहेत.
 
सिंधुदुर्गातील वेंगुर्ला तालुक्यात रेडी गावात दि. 22 ऑक्टोबर 1987 रोजी स्वप्निलचा जन्म झाला. या गावातच स्वप्निल यांचे संपूर्ण बालपण गेले. आई, वडील, एक भाऊ, दोन बहिणी यांच्यासोबतच पाच काका, त्यांचे कुटुंब असा साधारण 50 जणांचा गोतावळा एका घरात गुण्यागोविंदाने राहायचा. त्यामुळे स्वप्निल यांना माणसांची ओढ लहानपणापासूनच. त्यांचे इयत्ता सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण प्राथमिक शाळा, रेडी नंबर एक याठिकाणी झाले, तर दहावीपर्यंतचे शिक्षण माऊली विद्यामंदिर, रेडी याठिकाणी झाले. त्यांचे वडील काही काळ मुंबई येथे जोगेश्वरीला कामानिमित्त होते. स्वप्निल हे दहावी झाल्यानंतर पुन्हा आपल्या गावी आले.
 
2003 मध्ये दहावीनंतर स्वप्निल यांनी जवळच असलेल्या खाणकाम सेंटरमध्ये ट्रकचालक म्हणून सुरुवात केली. यालाच जोडून त्यांनी स्वतःचा व्यवसायही सुरू केला होता. एके दिवशी संध्याकाळी स्वप्निल आपल्या मित्रांसोबत नाक्यावर बसले होते. तेव्हा आपणही दशावताराचे नाटक सुरू करूया, असा विषय झाला. कारण, गावात चालणारी दशावताराची नाटके ते लहान वयातच बघत आले आहेत. ते पाहून त्यांनाही वाटायचे की, आपणही हे करावे. तसे पाहिल्यास, स्वप्निल यांना लहानपणापासून नाटकात काम करण्याची आवड. शाळेत असताना अनेक नाटिका त्यांनी सादर केल्या. तेव्हा बागलकर म्हणून सर होते, ते नाटिका बसवायचे. आवड तर प्रचंड होती, मात्र या क्षेत्राकडे लगेच वळता येत नव्हते.
 
‘कोरोना’च्या काळात ते आणि त्यांच्या मित्रपरिवाराने ठरवले की, आपणच दशावतार नाटक मंडळ का नाही सुरू करत? आजगावकर, दादा नाईक, दादा राणे कोणास्कर, मंगेश राणे, जयसिंग राणे, दत्त प्रसाद शेणाई, बाबा मयेकर, सुनील तळवणेकर हे त्यांचे गुरूवर्य. त्यांच्या आणि सहकलाकारांच्या पुढाकाराने अखेर मंडळाचा श्रीगणेशा झाला. ‘दत्त माऊली दशावतार नाट्यमंडळा’ची स्थापना झाली. ‘रावणाचा विधिलेख’ हे त्यांचे पहिले नाटक. त्यातली जंबूराक्षसाची भूमिका करणारे स्वप्निल नाईक.
 
मंडळातील कलाकारांची इच्छाशक्ती पाहता, परिसरातील इतर दशावतारी नाट्यमंडळींचाही पाठिंबा मिळाला. हळूहळू येणार्‍या प्रेक्षकांनाही नाटक आवडू लागले. त्यातून एक विश्वास निर्माण होऊ लागला. त्यानंतर मग ‘रुंदा जलदर’ नाटक सुरू झाले. मग कालांतराने नाटकांच्या स्पर्धेत उतरायला सुरुवात केली. यादरम्यान कधी अपयश आलेच, तर ते खचून गेले नाहीत. आपण कुठे चुकलो, याची पडताळणी त्यांनी केली. त्यानंतर जी सुधारणा येत गेली, तेव्हा अनेक ठिकाणी त्यांचा गौरवही झाला. ‘जलधर’ भूमिकेसाठी मिळालेला प्रथम पुरस्कार त्यांपैकीच एक. दशावतार करत असताना एकीकडे खाणकाम क्षेत्रातील कामही सुरू होते. नंतर सावरेश्वर नाट्यमंडळ कंपनीत कामाला लागल्यानंतर ‘खाणकामा’च्या ठिकाणचे ड्रायव्हिंग कमी होत गेले.
 
स्वप्निल यांच्या ‘दत्त माऊली दशावतार नाट्यमंडळा’चे एक खास वैशिष्ट्य म्हणजे, या मंडळात एकूण 15 जण आहेत आणि हे सर्वजण नाट्यमंडळाचे मालक आहेत. म्हणजेच काय तर, नायक किंवा खलनायकाची भूमिका करणारा असेल, तर त्याला जास्त मानधन असते; त्याप्रमाणे सहकलाकारांना त्यांच्या मानाने थोडे कमी मानधन असते. मात्र, इथे पाहिल्यास, नाटकाच्या नायकापासून ते तळीवाला, गडीचे काम करणार्‍या कलाकारापर्यंत सर्वांना एकसमान मानधनाचे वाटप होते. आज नाट्यमंडळ काढून पाच वर्षे झाली, न चुकता वर्षाला 250 नाटकांचा रेकॉर्ड या नाट्यमंडळाच्या नावे आहे. सिंधुदुर्ग, मुंबई, पुणे अशा विविध ठिकाणी त्यांचे कार्यक्रम चालतात. आज मंडळातील कलाकारांच्या अथक परिश्रमांतून ‘दत्त माऊली दशावतार नाट्यमंडळ’ सिंधुदुर्गातील नामवंत मंडळ म्हणून नावारुपाला आले आहे.
 
एक गोष्ट म्हणजे लिखित काही नसते; ना कुठली स्क्रिप्ट पाठ करावी लागते. पुराणातील एखादा प्रसंग घ्यायचा आणि त्यावर अभ्यास करून संपूर्ण नाटक बसवायचे. एखादवेळेस नाटकात आपला रोल नसेल, तर कोणी खचून जात नाही. पुढल्या ठिकाणी दुसर्‍या प्रयोगात आपल्याला नक्कीच संधी मिळेल, हा समजूतदारपणा कलाकारांकडे आहे. दशावतारात जास्त वेतन मिळत नसल्याने घरच्यांचा आधी नकार होता. संसार कसा चालेल, हा प्रश्न निश्चितच होता. मात्र, पैशांपेक्षा यातून मिळणारे समाधान आणि सन्मान हाच स्वप्निल यांच्यासाठी आणि मंडळातील इतर कलाकारांसाठी मौल्यवान आहे. जांबूराक्षस, रावण, कंस असे विविध खलनायक साकारून त्यांनी रंगवलेल्या पात्रामुळे स्वप्निल यांची विशेष ओळख आज तयार झाली आहे. स्वप्निल नाईक यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने अनेक शुभेच्छा!