भारताचा बांग्लादेशला समुद्रकोंडीचा धडा, बंगालचा उपसागर वापरण्यास मज्जाव
पंतप्रधान युनुस यांच्या वादग्रस्त विधानाला भारताचे उत्तर
10-Apr-2025
Total Views |
नवी दिल्ली : बांग्लादेशचे पंतप्रधान मोहम्मद युनुस यांनी ईशान्य भारताची कोंडी करण्याच्या वल्गना करताच भारताने आता त्याला चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. भारताने आता बांग्लादेशला व्यापारासाठी बंगालच्या उपसागरातील भारतीय किनारा वापरण्याची परवानगी दिली होती. आता भारत सरकारने काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार बांग्लादेशला भारतीय किनारा वापरण्याची बंदी करण्यात आली आहे. आता बांग्लादेशला त्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी भारतातील किनारी प्रदेशावरील बंदरे, विमानतळ आता वापरता येणार नाही. भारताने केलेल्या या कारवाईमुळे बांग्लादेशला चांगलाच दणका बसला आहे.
भारत सरकारने २९ जून २०२० रोजी एक परिपत्रक काढले होते. त्यात बांग्लादेशला त्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी बंगालच्या उपसागरातील बंदरे आणि विमानतळ वापरु देण्यास परवानगी दिली होती. या सवलतीस भारतीय व्यापाऱ्यांनी आणि त्यात प्रामुख्याने वस्त्रोद्योग क्षेत्राकडून ही सवलत मागे घेण्याची विनंती करण्यात आली होती. तरी भारत सरकारने ती सवलत सुरुच ठेवली होती. आता मात्र बांग्लादेशची मोठी कोंडी होणार असून भारतातील उद्योगक्षेत्राला आता त्याचा फायदा होणार आहे. भारत सरकारने ८ एप्रिल २०२५ रोजी त्याबाबतचे अधिकृत परिपत्रक काढले आहे.
काय म्हणाले होते मोहम्मद युनुस ?
बांग्लादेशचे पंतप्रधान मोहम्मद युनुस यांनी त्यांच्या चीन दौऱ्यात भारतविरोधी गरळ ओकली होती. ते म्हणाले होते की “ भारताची ईशान्येकडील सात राज्ये ही जमिनीने वेढलेली आहेत. त्यांना समुद्रापर्यंत पोहोचण्याचा कुठलाच मार्ग नाही. त्यामुळे त्यांना बांग्लादेशच्या मदतीवर अवलंबून राहावे लागते. ही बाब चीनच्या पथ्थ्यावरच पडणारी आहे.” असे युनुस म्हणाले होते.
भारत सर्वसमावेशक दृष्टीकोनातून सहकार्याचा पुरस्कर्ता आहे- एस जयशंकर
मोहम्मद युनुस यांच्या बाष्कळ बडबडीला भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांच्या खास संयत शैलीत उत्तर दिले. ते म्हणाले “भारत हा सर्वसमावेशक आणि सहकार्यातून विकास साधण्याला महत्व देणारा देश आहे. भारताकडे बंगालच्या उपसागराचा ६५०० किमीचा सर्वाधिक लांबीचा किनारा आहे. त्यामुळे भारताने सर्व बिमस्टेक देशांना त्यांच्या देशातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी जसे की रेल्वे, रस्ते बांधणी. यांसाठी मदत केली आहे. त्याचबरोबर आसियान राष्ट्रांनादेखील भारताने मदत केली आहे. ईशान्य भारत या सर्व राष्ट्रांच्या विकासाच्या समन्वयाचे केंद्र बनत आहे. भारतासाठी हे महत्वाचे आहे”. असे म्हणत जयशंकर यांनी मोहम्मद युनुस यांना सुनावले.