मुंबई: ( Devendra Fadanvis on healthcare in the state ) “राज्यातील आरोग्यसेवेला आता बळकटी मिळणार आहे. आरोग्य उपकेंद्र ते संदर्भ सेवा रुग्णालयांपर्यंत असलेल्या विविध आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी विस्तृत प्रकल्प तयार करावा,” असे निर्देश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “हा प्रकल्प आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने ’मिशन’ म्हणून राबविण्यात यावा,” अशा सूचना बुधवार, दि. ९ एप्रिल रोजी दिल्या.
‘सह्याद्री’ अतिथीगृहावर बुधवारी आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रकल्पांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या बैठकीला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर, ‘मित्रा’ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर आदी उपस्थित होते. तसेच दूरसंवाद प्रणालीद्वारे आशियाई विकास बँकेचे प्रतिनिधी निशांत जैन सहभागी झाले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “कर्करोग निदान उपचाराबाबत केंद्राने राष्ट्रीय कर्करोग उपचार धोरण आणले आहे. याच धर्तीवर कर्करोग निदान व उपचारासाठी संदर्भ सेवा देण्याबाबत प्रभावी कार्यपद्धती ठरविण्यात यावी. कर्करोगावर केमोथेरपी, रेडिएशन थेरपी या उपचारांचा समावेश असावा.
यासंदर्भात विहित कालमर्यादा ठरवून कार्यवाही करण्यात यावी. वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करावा. नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी नावीन्यपूर्ण उपायांचा अवलंब करण्यात यावा. राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्यात येत आहे. महाविद्यालयांसाठी संबंधित जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य विभागाची रुग्णालय संलग्न करण्यात आली आहेत. याबाबत जास्त लोकसंख्या व रुग्णसंख्येचे भार असलेल्या ठिकाणी स्वतंत्र रुग्णालय निर्माण करावे,” अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.