संतमय वातावरणात पंढरपूरची 'वारी' या चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न!

01 Apr 2025 19:15:31


The grand opening of the film


मुंबई : पंढरीची 'वारी' म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचा आनंदोत्सव. वर्षभराची ऊर्जा देणारा आनंदसोहळा म्हणून पंढरीच्या वारीकडे पाहिलं जातं. महाराष्ट्राचे सांस्कृतिक अधिष्ठान असलेली ही पंढरपूरची ‘वारी’ आता मराठी चित्रपटरूपाने आपल्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न झाला. मा. आमदार किसन कथोरे यांनी विधीवत पूजा करून या चित्रपटाला शुभाशिर्वाद दिले. अभिनेता प्रसाद ओक, वैभव मांगले, गणेश यादव, प्रणव रावराणे या दिग्गज कलाकारांच्या साथीने ‘वारी’ चा हा प्रवास आपल्याला घडणार आहे.


प्रवास ओढीचा, विठ्ठलाच्या गोडीचा! अशी भावना असणारी वारी प्रत्येकाला ओळखीची असली तरी दरवेळी तिचा नवा अनुभव आयुष्य समृद्ध करणारा असतो. पंढरपूरी विठूरायाला भेटण्याची तळमळ असतेच , पण त्यापेक्षाही पायी वारीतून वाटचाल करण्याचा आनंद आभाळाएवढा असतो. धन्यतेची अनुभूती देणारा हा प्रवास वारकरी भक्तांना ‘आतून’ श्रीमंत करतो, वारीची परंपरा मराठी मातीचं सांस्कृतिक वैभव 'वारी' चित्रपटातून मांडण्यात येणार आहे.


वारीत अध्यात्म आहे, मॅनेजमेंट आहे, लोककला, संगीत, संस्कृती, मानवी भाव भावनांचा संगम सर्वच बघायला मिळतं. त्यामुळं वारीला शिक्षणाचं लोकपीठ का म्हटलं जातं हे वारीत आल्यानंतरच कळतं. ‘कितीही लिहिलं तरी आणि वाचलं तरी वारी कळणार नाही..त्यासाठी वारीतच गेलं पाहिजे..आम्ही सुद्धा चित्रपटरुपी 'वारी' तून हा प्रवास अनुभवणार आहोत, याचा आनंद कलाकारांनी याप्रसंगी व्यक्त केला’.


राज फिल्म्स अँड डिस्ट्रीब्युशन प्रस्तुत ‘वारी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कांबळे तर निर्मिती राजेश सावळाराम पाटील यांची आहे. चित्रपटाची कथा मनोज येरुणकर यांची असून पटकथा-संवाद मच्छिंद्र बुगडे यांचे आहेत. छायाचित्रण योगेश कोळी यांचे आहे. कार्यकारी निर्माता महेश चाबुकस्वार आहेत. ‘वारी’ चित्रपटाच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.




Powered By Sangraha 9.0