कांद्याच्या शेतात झाली बिबट्याच्या माय-लेकरांची पुनर्भेट; ऊसानंतर आता कांद्याच्या शेतात बिबट्याचा ठिय्या?

01 Apr 2025 23:11:09
leopard cub reunion




मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
नाशिक तालुक्यातील देवळा परिसरात मंगळवार दि. २५ मार्च रोजी कांद्याच्या शेतात बिबट्याचे पिल्लू आढळले होते (leopard cub reunion). वन विभागाने 'रेस्क्यू-नाशिक' संस्थेच्या मदतीने या पिल्लाची त्याच्या आईसोबत पुनर्भेट घडवून दिली (leopard cub reunion). मात्र, या निमित्ताने ऊसाच्या शेतात अधिवास करणारा बिबट्या आता कांद्याच्या शेतात देखील आपले बस्तान बसवण्याच्या तयारीत आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. (leopard cub reunion)
 
 
देवळा परिसरातील एका वस्तीशेजारी मंगळवार पहाटे अचानक मोर जोर जोरात ओरडू लागले. तिथेच शेजारी असणाऱ्या कुक्कुटपालन केंद्रातील कर्मचाऱ्यांना हा आवाज ऐकू आल्यावर ते बाहेर पडले. त्यावेळी कांद्याच्या शेतामधून पिल्लाला घेऊन जाणारी बिबट्याची मादी त्यांना दिसली. माणसांची चाहूल लागताच मादी बिबट्या शेतातच पिल्लाला टाकून पसार झाली. लोकांनी या पिल्लासंदर्भातील माहिती वन विभागाला दिली. वन विभागाने लागलीच रेस्क्यू-नाशिक टीमच्या मदतीने घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी त्यांना पिल्लू बेवारस अवस्थेत आढळले. हे पिल्लू साधारण महिन्याभराचे होते आणि ते मादी होते.
 
 
 
पिल्लाला ताब्यात घेऊन रेस्क्यू-नाशिकच्या स्वयंसेवकांनी सायंकाळ होऊपर्यंत त्याचा सांभाळ केला. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता सापडलेल्या ठिकाणीच म्हणजे कांद्याच्या शेतात या पिल्लाला टोपलीखाली ठेवण्यात आले. पिल्लासह मादीच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी त्याठिकाणी लाईव्ह कॅमेरा लावण्यात आला. साधारण ७ वाजण्याच्या सुमारास मादी त्याठिकाणी आली आणि पिल्लाला घेऊन गेली. मात्र, यानिमित्ताने कांद्याच्या शेतात देखील आता बिबट्या अधिवास करु लागला आहे का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. देवळ्याचे वनपाल प्रसाद पाटील यांनी याविषयी सांगितले की, "बहुधा बिबट्याची ही मादी आपल्या पिल्लाला एका परिसरातून दुसऱ्या परिसरात हलविण्याच्या प्रयत्नात होती. त्यावेळी ही घटना घडली. घटनास्थळापासून काही अंतरावर बंद पडलेला कारखाना असून काही महिन्यांपूर्वी त्याठिकाणी बिबट्याच्या वावराची माहिती आम्हाला स्थानिकांनी दिली होती. त्यामुळे त्या पडीक कारखान्यामध्येच या मादीने पिल्लाला जन्म दिल्याची शक्यता आहे."
 
 
Powered By Sangraha 9.0