मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुलुंडमधील नवघर परिसरातील एका गृहनिर्माण वसाहतीमध्ये शिरलेल्या कोल्ह्याला मंगळवार दि. १ एप्रिल रोजी वन विभागाने पकडले (jackal rescue). 'राॅ' या प्राणी बचाव संस्थेच्या माध्यमातून या कोल्ह्याला पकडण्यात आले (jackal rescue). विशेष म्हणजे हा कोल्हा पूर्व द्रुतगती महामार्ग ओलांडून याठिकाणी आला होता. (jackal rescue)
कोल्ह्यांचा वावर जंगल, गवताळ प्रदेश, कांदळवन, शेत जमिनी आणि शहरी अधिवासातही आढळतो. मु्ंबईत प्रामुख्याने कांदळवनांमध्ये कोल्ह्यांचा अधिवास आहे. 'गोल्डन जॅकल' प्रजातीचे कोल्हे मुंबईतील कांदळवनांमध्ये सापडतात. विक्रोळी, नवी मुंबई, पूर्व उपनगरातील गोराई - मनोरी आणि अंधेरी लोखंडवाला भागातील कांदळळवन आसपासच्या परिसरात कोल्ह्यांचा वावर समोर आला आहे. अशा परिस्थितीत मुलुंड पूर्वेकडील नवघर परिसरातून मंगळवारी एका कोल्ह्याचा बचाव करण्यात आला. हा कोल्हा गाडीखाली लपून बसला होता. यावेळी वन विभागाने राॅ या वन्यजीव बचाव संस्थेच्या मदतीने या कोल्हाला पकडले.
या कोल्ह्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल, अशी माहिती 'राॅ' संस्थेचे प्रमुख पवन शर्मा यांनी दिली. विशेष म्हणजे मुलुंड पूर्वेकडील भागात पूर्व द्रुतगती महामार्गाच्या पलीकडे कांदळवन असून अलीकडे नवघर परिसर आहे. त्यामुळे या कांदळवनामधून बाहेर पडून महामार्ग ओलांडून या कोल्ह्याने नवघर परिसरात आसरा घेतल्याचे या घटनेवरुन समोर आले आहे.