आनंदाचे डोही आनंदतरंग

    01-Apr-2025
Total Views |
 
The waves of joy
 
‘आनंदाचे डोही आनंद तरंग। आनंदची अंग आनंदाचें॥’ हे साक्षात तुकोबाच सांगून गेले. अर्थात, मी आनंदाचा डोह झालो असल्यामुळेच, माझ्यात आनंदाच्या लाटा उसळतात. म्हणजेच, आनंद हेच आनंदाचे अंग आहे. असा हा ‘आनंद’ शब्द नुसता वाचला, उच्चारला, ऐकला तरी मनस्वी सुखावणारा. अशी ही आनंदशक्ती! पण, वास्तव जीवनात या आनंदाची अनुभूती ही बरेचदा क्षणभंगूर ठरते. अशा या आनंदाच्या शोधार्थ आपले मनही फुलपाखरासारखे बागडत असते. कधी आनंद गवसतो, तर कधी तो निसटतो. म्हणूनच मग सदैवी आनंदी राहण्यासाठी नेमके काय करायचे, असा प्रश्नही अनेकांना पडणे साहजिकच. याच प्रश्नाचा आज मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून कानोसा घेण्याचा केलेला हा प्रयत्न...
 
पृथ्वीतलावरील प्रत्येक व्यक्ती आनंदाच्या शोधात असते. परंतु, हा आनंद नेमका कसा शोधावा, याचा प्रत्येकाचा वेगवेगळा अंदाज असतो, मार्ग असतो. आपल्यापैकी अनेकजण त्याचा शोध बाह्य गोष्टींमध्ये घेतात, जसे की मोठे घर, ऐहिक संपत्ती, नोकरीतील यश. असे मानले जाते की, यांमध्येच आयुष्यातील खरा आनंद दडलेला आहे. मात्र, मानसशास्त्र आणि मेंदू विज्ञानाच्या संशोधनानुसार, खरी आणि टिकाऊ आनंदाची गुरुकिल्ली आपल्या स्वतःच्या मनात दडलेली आहे. आनंद हा शिकता येऊ शकतो आणि आपला मेंदू अधिक आनंदी होण्यासाठी आपण त्याला प्रशिक्षण देऊ शकतो.
 
सकारात्मक मानसशास्त्राने आनंदाच्या यंत्रणेवर महत्त्वपूर्ण अंतर्दृष्टी दिली आहे. संशोधनातून असे दिसून आलेले आहे की, आपल्या एकूण आनंदी असण्यामागे बाह्य परिस्थितींचा केवळ थोडा भाग असतो. त्याऐवजी आपले अंतर्गत विचार, भावनिक समायोजन आणि दैनंदिन सवयी या आनंदात मोठी भूमिका बजावतात. मेंदूतील आनंदाच्या प्रक्रियांचे ज्ञान घेतल्यास, आपण आपले विचार जाणीवपूर्वक बदलून अधिक समाधान मिळवू शकतो.
 
जीवनात आपल्याभोवती नेहमीच अनेक घटना घडत असतात, ज्या आपल्या मानसिक स्थितीवर परिणाम करू शकतात. पण, या सर्व गोष्टींमध्ये, आनंद स्वीकारणे, हे आपल्याच हातात आहे. आनंदी राहण्याचा निर्णय नेहमी आपल्यावर अवलंबून असतो. त्यामुळे नेहमी आनंदी राहण्याचे विचार आणि प्रेरणादायी वचने आपल्याला दररोज प्रेरित करू शकतात. नेहमी आनंदी राहाणे, हे आपल्या मनाने घेतलेल्या अनुभवाचा परिणाम असतो. जर आपण सकारात्मक विचार केले, तर आनंदी राहणे सोपे होते. पण, जर नकारात्मक विचार करत राहिलो, तर आपण स्वतःला दुःख, निराशा आणि तणावाने बेजार करतो आणि प्रत्येक लहानशा गोष्टीवर चिडचिड करू लागतो. म्हणून, नेहमी सकारात्मक विचार करा आणि आनंदी राहण्याची सवय लावा.
 
आपला मेंदू आनंद कसा प्रक्रिया करतो?
 
आपल्या भावना मेंदूमधील रसायनांद्वारे नियंत्रित केल्या जातात. काही महत्त्वाचे न्यूरोट्रान्समीटर आनंद आणि भावना नियंत्रित करतात. 
डोपामिन - आनंद आणि प्रेरणा वाढवतो. काहीतरी मिळवले की डोपामिन स्रवते.
सेरोटोनिन - शांतता आणि समाधान देते. प्रसन्न सामाजिक संबंध ठेवल्यास वाढतो.
ऑक्सिटोसिन - प्रेम, विश्वास आणि जिव्हाळा निर्माण करतो.
एन्डॉर्फिन्स - वेदना कमी करतो आणि आनंदी ठेवतो. व्यायाम आणि हसल्याने विकसित होतो.
या शास्त्रीय प्रक्रिया समजून घेतल्यास, आपण आनंदी राहण्यासाठी स्वतःला योग्य सवयी लावू शकतो.
न्यूरोप्लॅस्टिसिटीची ताकद : सकारात्मकता वाढवण्यासाठी मेंदू पुनर्रचनेची क्षमता.
संशोधन दर्शवते की, एका व्यक्तीला दररोज सुमारे 50 हजार विचार येतात. त्यांपैकी जवळजवळ 70 टक्के विचार नकारात्मक असतात. हा नकारात्मकतेचा कल पूर्वीच्या कडवट अनुभवातून म्हणा किवा जीवनसंघर्षातून आपल्यात रुजलेला आहे; पण आपण जाणीवपूर्वक तो बदलू शकतो. आजघडीला न्यूरोसायन्सच्या महत्त्वाच्या शोधांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा शोध म्हणजे, न्यूरोप्लॅस्टिसिटी. मेंदू स्वतःमध्ये नवीन न्यूरल कनेक्शन्स तयार करून विविध बदल घडवू शकतो. याचा अर्थ असा की, आपण आपल्या विचारसरणीत सकारात्मक बदल घडवू शकतो.
 
आनंद वाढवण्यासाठी प्रभावी सवयी :
 
1. नकारात्मक विचारांची पुनर्रचना - विचारांमध्ये सकारात्मक बदल घडविण्यासाठी नकारात्मक विचारांची पुनर्रचना काही विशिष्ट मानसोपचार पद्धती वापरून करता येते.
 
2. कृतज्ञतेचा सराव - आभार प्रदर्शन आणि दैनंदिन सकारात्मक अनुभव नोंदवणे, हे आनंद वाढवते.
 
3. सहकार्य आणि दयाळूपणाचे आचरण - इतरांसाठी चांगल्या गोष्टी केल्याने ‘ऑक्सिटोसिन’ हे रसायन वाढते, ज्यामुळे आनंद मिळतो.
 
4. शारीरिक हालचाल आणि व्यायाम नियमित व्यायामामुळे ‘एन्डॉर्फिन’ आणि ‘डोपामिन’ स्रवतात, ज्यामुळे मनस्थिती सुधारते.
 
5. साक्षीभाव (माईंडफुलनेस) आणि ध्यान - हे भावना नियंत्रित करण्यास, तणाव कमी करण्यास आणि वर्तमानावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते.
 
6. वाढीच्या मानसिकतेचा (ॠीेुींह चळपवीशीं) स्वीकार - अडचणींना संधी मानून त्यातून शिकण्याची वृत्ती वाढवली, तर दीर्घकालीन आनंद मिळतो.
 
बाह्य घटकांची भूमिका
 
व्यक्तीची आंतरिक विचारसरणी जितकी महत्त्वाची आहे, तितकीच बाह्य परिस्थिती व घटकांची भूमिकादेखील आहे. सामाजिक संबंध, आर्थिक स्थिरता आणि शारीरिक आरोग्य हे घटकही आनंदावर प्रभाव टाकतात. परंतु, बाह्य परिस्थितीवर अवलंबून न राहता, जर आपण अंतर्गत सकारात्मक सवयी जोपासल्या, तर दीर्घकालीन आनंद आणि समाधान मिळवू शकतो.
सकारात्मक विचारसरणी उपयुक्त असली, तरी केवळ सकारात्मक विचारसरणी पुरेशी नाही. शिवाय, नकारात्मक भावना दडपून टाकणे योग्य नाही. खरा आनंद हा संतुलनातून येतो. सर्व भावनांना स्वीकारून त्यांचा योग्य प्रकारे सामना करून सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे महत्त्वाचे आहे.
 
शाश्वत आनंदाचा प्रवास
 
आनंद हा स्थिर नसतो. तो एक गतिमान प्रवास आहे, जो आपल्या विचारांवर, भावना व्यवस्थापनावर आणि दैनंदिन कृतींवर अवलंबून असतो. मेंदूच्या न्यूरोप्लॅस्टिसिटीचा लाभ घेत, साक्षीभावाचा सराव करून, कृतज्ञता जोपासून आणि सामाजिक नाती दृढ करून आपण आपल्या मनाला अधिक आनंदी ठेवू शकतो.अस्थिरतेने भरलेल्या जगात, आपले अंतर्गत समाधान आणि लवचिकता वाढवण्याची क्षमता ही सर्वांत मौल्यवान कौशल्यांपैकी एक आहे. आनंद हा केवळ एक ध्येय नाही; तो आपली विचारसरणी आणि जीवनशैली घडवणारा एक प्रवास आहे. आपण सर्वांनी हा प्रवास स्वतःच्या हातात घ्यायला हवा.
 
 
डाॅ शुभांगी पारकर