शेअर बाजारात ‘टॅरिफ’कंप, जवळपास १४०० अंशांचा खड्डा

01 Apr 2025 18:06:49
falls  
 
 
मुंबई : शेअर बाजारात मंगळवारी धमाका झाला. अमेरिकेच्या आर्थिक रेसिप्रोकल टॅरिफ म्हणजे आयातशुल्क लादण्याच्या निर्णायामुळे शेअर बाजाराला कंप सुटल्यासारखे झाले आणि कुठल्याच सत्रात न सावरता शेअर बाजार १३९० अंशांनी कोसळला. नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच शेअर बाजाराला दणका बसला आहे. राष्ट्रीय शेअर बाजारातही ३५३ अंशांची पडझड दिसून येत, निर्देशांक २३,१६५ अंशांवर बंद झाला. कुठल्याच सत्रात शेअर बाजाराला सावरता आले नाही.
 
शेअर बाजारातील मुख्य ३० कंपन्यांपैकी २७ कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. घसरण झालेल्या कंपन्यांमध्ये एचसीएल टेक, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, इन्फोसिस या कंपन्यांचे शेअर्स जोरदार आपटले. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणुकदारांचे मोठे नुकसान झाले. क्षेत्रवार घसरण बघता, रिअॅल्टी क्षेत्र, ग्राहकोपयोगी वस्तु, वैद्यकीय फार्मा, खासगी बँका या क्षेत्रांमध्ये जोरदार घसरण झाली.
 
शेअर बाजारातील या भूकंपाला तीन प्रमुख कारणे सांगीतली जात आहेत. पहिले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकड़ून ज्या देशांकडून अमेरिकी वस्तुंवर आयात कर लादला जात आहे. त्या देशांवर आयातशुल्क लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात भारतावर १०० टक्के शुल्क लागू करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यापुढचे कारण म्हणजे परदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांकडून गुंतवणुक काढून घेण्याचा सपाटाच लावला आहे. याच बरोबर सर्वात महत्वाचे म्हणजे आर्थिक अनिश्चितता. अमेरिकेतील ट्रम्प सरकारच्या सतत बदलत्या धोरणांमुळे जागतिक पातळीवर कमालीची अनिश्चितता तयार झाली आहे. यामुळेही शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर घसरण झाली. आता यातून शेअर बाजार कधी सावरतोय याकडे लक्ष लागले आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0