भगवान शिवाचे गुण प्रत्येकाने आत्मसात करण्याची गरज : सरसंघचालक
01 Apr 2025 12:53:37
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Shiv Tandav Stotra Program) "भगवान शिवाची भक्ती अत्यंत साधी आणि सरळ आहे. त्यांना फक्त प्रेम, भक्ती आणि भावनांची गरज आहे. त्यांचे स्मरण करून त्यांचे गुण आत्मसात करण्याची गरज आहे", असे म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी समाजाला आवाहन केले आहे. नागपूर जिल्ह्यातील कामठी शहरात शिवराज्य प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित सामूहिक शिव तांडव स्तोत्र पठण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्रीमंत राजे मुधोजी भोसले, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार परिणय फुके, माजी आमदार टेकचंद सावरकर उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधत सरसंघचालक पुढे म्हणाले, भगवान शिवाचा महिमा अपार आहे. ते देवांचे देव महादेव तर आहेतच. ते जितके देवांचे आहेत तितकेच ते दानवांचेही आहेत. असे हे शीवपरमेश्वर कैलास पर्वत, काशी धाम, १२ जोतीर्लिंग यांशिवाय विविध ठिकाणी त्यांचे स्थान आहे. केवळ भारतातच नाही तर, संपूर्ण विश्वात स्वयंभू शिवलींग सापडू लागली आहेत, कारण ते आदिदेव असून साऱ्या विश्वात त्यांची महिमा आहे. ते चराचरांत आहेत.
समुद्रमंथनाची गोष्ट सांगत ते म्हणाले, समुद्र मंथनातून जेव्हा अमृत बाहेर पडले तेव्हा शीव परमेश्वर पुढे झाले नाहीत, मात्र जेव्हा विष बाहेर पडले तेव्हा इतरांवर संकट येऊ नये म्हणून स्वतः ते विष प्राशन केले. म्हणजेच संकटप्रसंगी स्वतः ते पुढे उभे राहिले. आपण आपल्या जीवनात त्यांचे अनुकरण करू शकतो का? म्हणजेच अधिकाअधिक लोकसेवा करू शकतो का, याचा विचार प्रत्येकाने करणे आवश्यक आहे.