सोनिया गांधीनी आता तरी भारतीय शिक्षणपद्धती स्वीकारावी

01 Apr 2025 16:33:17
 
Devendra Fadanvis on soniya gandhi
 
 
मुंबई: ( Devendra Fadanvis on soniya gandhi ) “लॉर्ड मेकॉले यांनी आम्हाला गुलाम बनवण्यासाठी जुनी शिक्षणपद्धती आणली होती. त्यामुळे ती आम्हाला कदापि मान्य नाही. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी आतातरी भारतीय शिक्षणपद्धतीचा स्वीकार करावा,” असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, दि. ३१ मार्च रोजी केला.
 
नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. सोनिया गांधी यांनी नुकतेच एका लेखाच्या माध्यमातून नवीन शिक्षणपद्धतीवर टीका केली. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारणा केली असता ते म्हणाले, “सोनिया गांधींनी आतातरी भारतीय शिक्षणपद्धतीचा स्वीकार करावा. आपल्या भारतीय शिक्षणपद्धतीचे भारतीयीकरण होणे, यात कुठलाही गैरप्रकार नाही. लॉर्ड मेकॉले यांनी आम्हाला गुलाम बनवण्यासाठी जुनी शिक्षणपद्धती आणली होती. ती आम्हाला कदापि मान्य नाही,” असे फडणवीस म्हणाले.
 
उत्तराधिकारी या विषयाशी माझा संबंध नाही
 
संजय राऊत यांनी “पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतील,” असे विधान केले. त्याविषयी विचारले असता फडणवीस म्हणाले, “पंतप्रधान मोदी हे स्वतः सक्षम असून त्यांचा उत्तराधिकारी शोधण्याची कुठलीही गरज नाही. 2029 मध्ये देश पुन्हा त्यांनाच पंतप्रधान म्हणून पाहण्यास इच्छुक आहे. वडील जिवंत असताना त्यांचा वारसदार शोधणे, ही आमच्या देशाची परंपरा नाही. ही मुघलांची संस्कृती आहे आणि तसाही उत्तराधिकारी या विषयाशी माझा कुठलाही संबंध नाही,” असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
 
राज ठाकरेंच्या मुद्द्यांवर विचार करू
 
- “राज्य चांगल्या पद्धतीने चालवण्याचे आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी सर्वांची मदत घेऊन, सर्वांना विश्वासात घेऊनच राज्य पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज ठाकरे यांचे संपूर्ण भाषण मी ऐकू शकलो नाही. मात्र, जेवढे मी ऐकले, त्यात त्यांनी काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर भाष्य केले. निश्चितच आम्ही त्यावर विचार करू.”
 
- “महाराष्ट्रातील नद्या निर्मळ झाल्या पाहिजेत, असा आमचा प्रयत्न आहे. त्याकरिता आम्ही मिशन हाती घेतले आहे. ही तत्काळ स्वरूपात होणारी कामे नाहीत. हा थोडा वेळ खाणारा आणि खर्चिक कार्यक्रम आहे. मात्र, ते केलेच पाहिजे, या मताचे आम्ही असल्यामुळे त्याची सुरुवात केली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात पवित्र गोदावरी नदीत लोक स्नान करतील. त्यावेळी त्यांना स्वच्छ पाण्याचा अनुभव कसा देता येईल, यादृष्टीने नियोजन सुरू आहे,” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0