वसई: ( Vasai Virar Municipal Corporation ) आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम दि. 21 सप्टेंबर 2024 रोजी पर्यावरण व हवामान बदल विभाग, राज्य शासन यांनी दिलेल्या निर्देशानुसार आयोजित करण्यात आली होती. सर्वात जास्त स्वयंसेवकांचा सहभाग, सर्वोच्च कचरा संकलन, प्लास्टिक कचर्याचे रिसायकलींग या तीन श्रेणीमध्ये वसई-विरार महानगरपालिकेला आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्डमध्ये मानांकन प्राप्त झाले आहे, अशी माहिती उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी दिली.
राष्ट्रीय किनारपट्टी कचरामुक्त करण्यासाठी प्रोत्साहित करणे, जागतिक महासागर आणि जलमार्गांचे जतन व संरक्षण करण्याबद्दल लोकांमध्ये जागृकता निर्माण करणे, हा स्वच्छता मोहीम साजरा करण्याचा मूळ उद्देश होता. दि. 21 सप्टेंबर 2024 रोजी राजोडी बिच, विरार (पूर्व) येथे आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त वसई-विरार शहर महानगरपालिका व ‘गो-शून्य प्रा. लि.’ यांच्या सहयोगाने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
दर मोहिमेअंतर्गत शहरातील स्वयंसेवक, शाळा, महाविद्यालये, एनसीसी व एनएसएस विद्यार्थी, महिला बचतगट, लोकप्रतिनिधी, पत्रकारवर्ग, सामान्य नागरिक, तसेच महापालिकेतील अधिकारी व कर्मचारीवर्ग असे 15 हजारांहून अधिक स्वयंसेवक यात सहभागी झाले होते. एकूण 53 मेट्रिक टन कचरा संकलन करून त्यातील 662 किग्रॅ प्लास्टिक कचर्याचे रिसायकल प्रात्याक्षिक यावेळी दाखविण्यात आले.
समुद्र किनार्याचे सौंदर्य अबाधित ठेवून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी महापालिकेने सुरू केलेली ही मोहीम केवळ आजची आवश्यकता नाही, तर आगामी पिढ्यांसाठी त्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची महत्त्वाची जबाबदारी आहे. महापालिका, स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून मोहिमेमध्ये सहभागी होणार्यांच्या मदतीने समुद्र किनार्यांच्या प्रदूषणाला नियंत्रित करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.
- अनिलकुमार पवार, आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका