१) राजकीय क्षेत्र निवडण्यामागे नेमके कारण काय?
- माझ्या जन्माच्या आधीपासून माझ्या घरातच राजकारण आहे. राजकारणाच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात लोकांची सेवा करू शकतो, हे मी लहानपणापासूनच बघितले. त्यामुळेच १०-१२ वर्षे कार्यकर्ती म्हणून काम केल्यानंतर मी इथपर्यंत पोहोचले.
२) राजकीय क्षेत्रात असताना एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते?
- महिला सक्षम आहे किंवा महिला नेतृत्व मान्य करण्यासाठी लोकांना थोडे जड जाते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी दुपटीने काम करावे लागते. आम्हीसुद्धा रात्री अपरात्री लोकांच्या मदतीला जाऊ शकतो, पोलिस स्टेशनची प्रकरणे सोडवू शकतो, हे सगळे त्या त्या प्रसंगी सिद्ध करावे लागते. त्यानंतर लोक निश्चितच आपल्याला नेता मानतात आणि आपल्या पाठीशी उभे राहतात.
३) सामान्य नागरिक ते मंत्रीपद हा प्रवास कसा होता?
- राजकारणात सुरुवातीपासूनच माझा खडतर प्रवास राहिला आहे. पण दुसऱ्याच टर्ममध्ये माझ्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला मंत्रिपद दिले. त्यामुळे आनंद होतोय.
४) गृहिणी ते लोकप्रतिनिधी हे समीकरण कसे साधता?
- मनावर खूप मोठा दगड ठेवून मुलांना आणि कुटुंबाला सोडून बराचवेळ कामासाठी द्यावा लागतो. फक्त राजकीय क्षेत्रातील स्त्रीलाच नाही तर स्वत:च्या करियरसाठी बाहेर पडणाऱ्या स्त्रीची जी मानसिक घालमेल होते त्याची मला जाणीव आहे. राजकारण म्हणजे २४ तास वचनबद्ध असे काम करावे लागते. स्वत:च्या कुटुंबापेक्षा आपण जे क्षेत्र निवडले त्या कार्यक्षेत्राला आपले कुटुंब समजून काम करतो. त्यामुळे साहाजिकच स्वत:च्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होते आणि कधीतरी त्याचे वाईटही वाटते. पण आपण जी जबाबदारी स्विकारली ती मोठी आहे, असे समजून काम करत असते. या सगळ्यात स्वत:चे छंद जोपासण्यासाठीही खूप कमी वेळ मिळतो.
५) यंदाच्या अर्थसंकल्पातून महिलांसाठी काय अपेक्षा आहेत?
- भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासात महिलांना सक्षम करण्यासाठी केंद्रात मोदीजींनी आणि राज्यात देवेंद्रजींनी आणलेल्या योजना आतापर्यंत कधीच कुणी आणल्या नव्हत्या. लेकीने जन्म घेतला की, महाराष्ट्रात ती लेक लाडकी झाली. तिचे शिक्षण, उच्च शिक्षण मोफत केले आहे. ती प्रेग्नेंट असल्यावर तिला मातृवंदना योजनेतून लाभ मिळतो. आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी लाडकी बहिण योजना आहे. बचतगटाच्या माध्यमातून लखपती दीदी बनवल्या जाताहेत. अहिल्याबाई होळकर योजनेच्या माध्यमातून महिलांना स्टार्टअपसाठी आर्थिक साहाय्य देत आहोत. आमच्या गावाकडच्या दीदी तर आज ड्रोन पायलट झाल्या आहेत. इतिहासात पहिल्यांदाच राज्यातील महिला सक्षम महिला दिन साजरा करत आहेत, असे मला वाटते.
६) या क्षेत्रात येणाऱ्या महिलांना काय सांगाल?
- ज्या महिला वेळ देऊ शकतात त्यांनी या क्षेत्रात आले पाहिजे. इथे चांगल्या मनाने काम केल्यास आपण चांगल्याप्रकारे लोकांची सेवा करू शकतो.
७) महिला सुरक्षेचा प्रश्न सोडवण्याठी काय प्रयत्न करणार आहात?
- केंद्रातील मोदीजींच्या सरकारने महिलांवर अत्याचार करणाऱ्यांसाठी कडक कायदे आणले असून त्याची अंमलबजावणीसुद्धा राज्यात तातडीने केली जाते. अत्याचार करणाऱ्याला तात्काळ पकडून त्याला कठोर शिक्षा केली जाते. पण बऱ्याचवेळा ओळखीच्या व्यक्तीकडूनच अत्याचार, अन्याय झालेला असतो. अशावेळी महिलांनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम आणि कठोर राहणे गरजेचे आहे.