मुंबई : प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेत १८१ लाभार्थी बांग्लादेशी असल्याचा खळबळजनक दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शुक्रवार, ७ मार्च रोजी केला आहे.
किरीट सोमय्या यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर ही माहिती देत बोगस लाभार्थ्यांची यादी पोस्ट केली आहे. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील भादवण गावात 'प्रधानमंत्री किसान सम्मान निधी' योजनेमध्ये १८१ बोगस बांगलादेशी लाभार्थी असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
मौजे भादवण येथे १८१ बोगस पीएम किसान योजनेचे लाभार्थी निदर्शनास आले असून सगळे लाभार्थी मुस्लीम समाजाचे आहेत. भादवण गावात आजपर्यंत एकही मुस्लीम कुटुंब अस्तित्वात नाही. भादवण गावाचा आणि यादीतील १८१ लाभार्थ्यांचा काहीही संबंध नाही. तरीसुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात मुस्लीम समाजाचे बोगस पीएम किसान योजेनेचे लाभार्थी कसे काय लाभ घेत आहेत? याची सखोल चौकशी करून सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.