महिलांचे सक्षमीकरण त्यांच्या कौशल्यात असते! न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांचे प्रतिपादन

08 Mar 2025 17:18:03
 
Mrudula Bhatkar
 
मुंबई : महिलांचे सक्षमीकरण त्यांच्या कौशल्यात असते. महिलांनी समाजात स्त्री म्हणून नव्हे तर व्यक्ती म्हणून वावरावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती तथा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या अध्यक्षा मृदुला भाटकर यांनी व्यक्त केले.
 
जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवार, ७ मार्च रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका महिला लैंगिक अत्याचार प्रतिबंध तक्रार समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, उप आयुक्त (परिमंडळ- १) डॉ. संगीता हसनाळे, उप आयुक्त तथा महिला लैंगिक अत्याचार प्रतिबंध प्रमुख अंतर्गत तक्रार समिती व सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्राच्या अध्यक्षा चंदा जाधव, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा, यांच्यासह महानगरपालिकेतील महिला अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होत्या.
 
हे वाचलंत का? -  महिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी - राज्यमंत्री मेघना बोर्डीकर
 
यावेळी बोलताना न्यायमूर्ती मृदुला भाटकर म्हणाल्या की, "महिलांचे सक्षमीकरण त्यांच्या कौशल्यात असून त्यांनी विविध कौशल्ये आत्मसात करण्याकडे अधिक लक्ष द्यावे. महिला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर बनल्या पाहिजे. महिलांनी समाजात किंवा कार्यालयात केवळ स्त्री म्हणून नव्हे तर एक व्यक्ती म्हणून वावरावे. सशक्त महिला सक्षमपणे जग घडवू शकतात. महिलांचा आर्थिक सक्षम होण्याकडे प्रवास वेगाने सुरू असून स्वत: कष्ट करून मिळवलेला मोबदला खर्च करण्याचा अधिकार मिळणे म्हणजे अर्थाने महिला आर्थिक सक्षम होणे होय. सक्षम होण्यासोबतच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक हक्कांसाठीही महिलांनी लढा द्यायला हवा. सध्याच्या काळात महिलांनी कणखर बनणेसुद्धा तितकेच गरजेचे आहे. महिलांनी शारीरिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी मैदानी खेळ खेळण्यास प्राधान्य द्यायला हवे. स्वत:सोबत आपल्या कुटुंबातील अन्य महिला आणि मुलींनाही कणखर बनवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत," असे त्या म्हणाल्या.
 
महिलांना समान वागणूक मिळावी - डॉ. अश्विनी जोशी
 
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी म्हणाल्या की, "महिला सक्षमीकरणासोबतच महिलांना समान वागणूकही मिळायला हवी. प्रत्यक्ष जमिनीवर कामकाज असलेल्या क्षेत्रात महिलांना समान संधी मिळायला हव्या. बृहन्मुंबई महानगरपालिका महिला लैंगिक अत्याचार प्रतिबंध तक्रार समिती महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असते," असे त्यांनी सांगितले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0