राज्यासह आपल्या तालुक्याचा, जिल्ह्याचाही सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी प्रयत्न करणारी अनेक नेतृत्वे स्थानिक पातळीवरही महाराष्ट्रात उभी राहिली. त्यांनी त्या त्या भागाच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न केले आणि आपल्याबरोबर त्या तालुक्यातील सर्वसामान्यांच्याही प्रगतीचा मार्गही सुकर करून दिला. रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांनी आपल्या तालुक्याच्या विकासासाठी ‘संगमेश्वर तालुका कुणबी सहकारी पतसंस्था’ स्थापन केली. आज ६० वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या या पतसंस्थेचे अध्यक्ष शांताराम सालप यांची घेतलेली ही मुलाखत...
- ६० वर्षांचा प्रदीर्घ प्रवास करणार्या या पतसंस्थेची स्थापना कशी झाली?
कोकणातील कुणबी समाजाचे नेते शामराव पेजे यांच्या प्रेरणेतून अनेक व्यक्ती कुणबी समाजाच्या उन्नतीसाठी पुढे सरसावल्या; त्यातीलच एक म्हणजे मामासाहेब भुवड. त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी दि. ४ मे १९६५ रोजी या संस्थेची स्थापना मुंबईतील परळ येथे केली. सुरुवातीला एकच शाखा असलेल्या या पतसंस्थेच्या आता मुंबईत एक आणि संगमेश्वर तालुक्यात दोन शाखा स्थापन झाल्या आहेत.
- एखादी वित्तीय संस्था चालवणे आणि त्यावर ग्राहकांचा विश्वास टिकवून ठेवणे, हे अतिशय जिकिरीचे काम या संस्थेत कसे केले जाते आणि ग्राहकांना कशा पद्धतीने सेवा दिल्या जातात?
ही पतसंस्था मुळात सामाजिक उद्दिष्टांच्या पायावरच स्थापन झाल्याने, या संस्थेत सभासद आणि त्यांच्याकडून घेतल्या जाणार्या ठेवी यांतूनच सगळा व्यापार चालतो. यासाठी प्रत्येक शाखेत सल्लागार नेमलेले आहेत. ते सभासद नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून घेणे, कर्जासाठी मागणी करणार्या सभासदांच्या अर्जांची छाननी करणे, कर्ज देणे, त्याची वसुली करणे या सर्व बाबी करतात. आजपर्यंत केवळ सभासदांकडून स्वीकारलेल्या ठेवींमधूनच या बँकेने व्यवहार केले आहेत. त्यामुळे कुठल्याही इतर बाह्य सहकार्याची आवश्यकता आम्हाला भासलेली नाही. एवढा विश्वास आमच्या संस्थेने कमावला आहे.
- संस्था चालवायची म्हटली की, चढ-उतार हे आलेच. तेव्हा या आव्हानात्मक काळाला कशा पद्धतीने सामोरे गेलात?
सर्वांत आव्हानात्मक काळ म्हणजे, ‘कोरोना’ महामारीचा काळ. या काळात फक्त आपणच नव्हे, तर संपूर्ण जगच आव्हानात्मक काळाला सामोरे जात होते. त्यामुळे या काळात दिलेल्या कर्जांची वसुली हा खूप काळजीचा भाग होता. परंतु, या काळातही कर्जदार म्हणून सभासदांच्या सहकार्याने या काळाला तोंड दिले. हळूहळू करत कर्जाची वसुली झाली. फारच किरकोळ प्रकरणांत न्यायालयापर्यंत प्रकरण गेले. बाकीची सर्वच प्रकरणे आमचे संचालक मंडळ, सल्लागार, कर्जा देतेवेळेस घेतलेले हमीदार यांच्यामार्फत ही परिस्थिती निभावून नेली.
- सध्या सतत येणार्या बातम्यांमधून, ‘पतसंस्था’ या विषयाबद्दल थोडीशी नकारात्मकताच समाजात पसरलेली दिसते. यामागची नेमकी काय कारणे असावीत, असे आपल्याला वाटते?
हे खरे असले तरी, आमच्या पतसंस्थेत आम्हाला वेगळा अनुभव आला आहे. गेल्या ६० वर्षांत कायमच सभासदांच्या विश्वासावर अव्याहतपणे ही संस्था सुरू आहे. कुठल्याही वित्तीय संस्था या विश्वासावरच चालतात. विश्वास टिकवून ठेवणे हाच यावरचा सर्वांत योग्य उपाय. त्यामुळे या वित्तीय संस्थांनी लोकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी कर्ज देणे आणि कर्जवसुली यांत पारदर्शकता असायला हवी, तरच संस्थांबद्दलच्या अशा घटना कमी होतील.
- बर्याचदा पतसंस्था बुडित कर्जांमुळे त्रस्त असतात. या समस्येवर कशा पद्धतीने मार्ग काढता येईल?
आता आमच्याच संस्थेचे उदाहरण देतो. आमच्या कुठल्याही सभासदाकडून कर्जाचा अर्ज आला की, आधी संचालक मंडळातर्फे त्याची छाननी होते. त्या व्यक्तीचा आधीचा सगळा ‘रेकॉर्ड’ तपासला जातो. त्यानंतर त्याची कर्ज घेण्याची, ते फेडण्याची कुवत बघितली जाते. त्या अर्जावर कायदेशीर सल्ला घेतला जातो. त्यानंतरच कर्ज दिले जाते. त्यामुळे अशा प्रकारे इतक्या कसोट्या पार केल्यानंतर कर्ज दिले गेले असल्याने त्यातून कर्ज बुडित खाती जाण्याची शक्यता फारच कमी होते. हेच जर इतर पतसंस्थांनी केले, तर हा डागच मुळात निघून जाईल.
- संगमेश्वर तालुक्यातून अनेकजण हे मुंबईसारख्या शहरांमध्ये स्वप्नपूर्तीसाठी दाखल होतात. त्यांना आपली संस्था कशा पद्धतीने साहाय्य करते?
अशा कारणांसाठी शहरांमध्ये येणार्या अनेकांना आमची संस्था सढळ हस्ते मदत करते. परंतु, शेवटी हा व्यवसाय आहे. त्यामुळे काही पथ्ये पाळावीच लागतात. त्यामुळे कुठलीही व्यक्ती आपल्या संस्थेची सभासद करून घेण्यापूर्वी त्याची पूर्ण तपासणी करून घेऊन त्यानंतरच त्याला सभासदत्व, कर्ज देणे या गोष्टी केल्या जातात. त्यामुळे फक्त तोंडओळख वगैरे गोष्टींवर आम्ही विसंबून राहात नाही आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, नावात जरी ‘कुणबी’ असले, तरी सर्व समाजाच्या नागरिकांना आम्ही सेवा देतो, सभासद करून घेतो.
- ६० वर्षांचा दीर्घ पल्ला गाठल्यानंतर आता भविष्यातील प्रगतीसाठी नियोजन कसे असणार आहे?
सध्या आमच्या संस्थेने ७७ कोटींच्या उलाढालीचा टप्पा गाठला आहे. आता या पुढील काळात १०० कोटींच्या उलाढालीचे लक्ष्य आहे आणि अशीच ‘ग्राहकांच्या विश्वासावर टिकून असलेली संस्था’ ही ओळख कायम राखणे, हेच आमचे लक्ष्य आहे.
हर्षद वैद्य