मुंबई (विशेष प्रतिनिधी) - लोणावळ्यातील पर्यटकांनी गजबजलेल्या पवना तलावाजवळ शुक्रवार दि. ७ मार्च रोजी सकाळी बिबट्याचा वावर आढळून आला. झाडावर चढलेल्या बिबट्याला स्थानिकांनी पकडण्याचा प्रयत्न केल्याने सहा जण जखमी झाले. मात्र, वन विभागाने प्रसंगावधान राखून 'रेस्क्यू-पुणे'च्या मदतीने स्थानिकांकडून बिबट्याचा ताबा मिळवला आणि त्याला वन्यजीव बचाव केंद्रात हलविले. (pawna lake leopard rescue)
पवना तलावाजवळ स्थानिकांना सकाळी झाडावर चढलेल्या एका बिबट्याचे दर्शन झाले. कदाचित लोकांना पाहिल्याने घाबरुन तो झाडावर चढला असावा. जर त्याला वेळ आणि जागा मिळाली असती, तर तो स्वतःहून जंगलात परत गेला असता. मात्र, खाली उतरल्यानंतर स्थानिकांनी त्याला दोरी आणि जाळ्यांचा वापर करून पकडण्याचा प्रयत्न केला. ज्यामध्ये सहा लोकं जखमी झाले. यासंदर्भात वन विभागाला सकाळी ८ वाजता माहिती मिळताच वनकर्मचारी 'रेस्क्यू-पुणे'च्या स्वयंसेवकांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बिबट्याला सुरक्षितपणे पिंजऱ्यात हलवले. त्याच्या अंगाभोवती घट्ट आवळलेला एक दोर काढण्यासाठी वैद्यकीय हस्तक्षेप आवश्यक होता. त्यामुळे बिबट्याला बावधन येथील वन्यजीव उपचार केंद्रात हलविण्यात आले.
बिबट्याच्या सध्याच्या स्थितीबद्दल 'रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट'च्या संस्थापक आणि अध्यक्ष नेहा पंचमिया यांनी माहिती दिली की, "बिबट्याची परिस्थिती स्थिर असून सध्या तो निरीक्षणाखाली आहे. त्याला किरकोळ जखमा झाल्या असल्या तरी कोणताही गंभीर धोका नाही. आमचे पथक त्याच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. पुढील उपचार आणि निर्णय वन विभागाच्या समन्वयाने घेतले जातील." या घटनेबद्दल पुण्याचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी नागरिकांसाठी सांगितले आहे की, "नागरिकांनी स्वतःहून वन्यप्राण्यांना पकडण्याचा प्रयत्न करू नये. प्रशिक्षित पथक आणि योग्य उपकरणांशिवाय अशा प्रकारे हस्तक्षेप करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. अशा घटनांमध्ये तातडीने वन विभागाला किंवा अधिकृत बचाव पथकाला माहिती द्यावी."