‘भिकीस्तान’ ही उपाधी मिळालेला पाकिस्तान आता अधिकृतरित्या ‘आतंकीस्तान’ बनला आहे. ‘इन्स्टिट्यूट फॉर इकोनॉमिक्स अॅण्ड पीस’ या संस्थेने नुकतेच ‘ग्लोबल टेरेरिझम इंडेक्स, २०२५’ अहवाल जाहीर केला. या अहवालानुसार, दहशतवादाने प्रभावित झालेल्या ६५ देशांमध्ये बुर्किनो फासो हा देश पहिल्या क्रमांकावर, तर पाकिस्तान दुसर्या क्रमांकावर आहे. दहशतवादी कृत्यांमध्ये पाकिस्तान दुसर्या क्रमांकावर असला, तरी स्वतःचे नाक कापून अपशकून करण्यामध्ये पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर आहे, हे नक्की!
तर या अहवालानुसार, दहशतवादी कारवायांसाठी सीरिया हा तिसर्या क्रमांकावर, नंतर माली, नायजर, नायजेरिया, सोमालिया, इस्रायल, अफगाणिस्तान आणि कॅमरून हे देश आहेत. या सगळ्या परिक्षेपात वाटते की, पाकिस्तान नावाचा जमिनीच्या तुकड्याचा जन्मच दहशतवादी कृत्ये करण्यासाठी झाला की काय, अशी पाकिस्तानची कारकीर्द. पाकिस्तानने पाळलेल्या दहशतवादी संघटनाच पाकिस्तानच्या मानगुटीवर वेताळ होऊन बसल्या आहेत. पाकिस्तानमध्ये दहशतवादामुळे दगावणार्यांची संख्या मागच्या वर्षापेक्षा यावर्षी ४५ टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षी १ हजार, ८१ लोक दहशतवादी कारवायांमध्ये अल्लाला प्यारे झाले होते. पण ‘ग्लोबल टेरेरेझिम इंडेक्स, २०२५’ यादी जाहीर होण्याआधीही हे जगजाहीरच होते की, पाकिस्तान दहशतवादी देश आहे. पाकिस्तानने ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेवर २००२ साली बंदी घातली.
भारतीय संसदेवर हल्ला घडवणे, पुलवामा लष्करी हल्ला घडवणे अशी भारतविरोधी दहशतवादी पार्श्वभूमी असलेली ही पाकिस्तानी दहशतवादी संघटना. या संघटनेचा प्रमुख मसूद अजहर याने शपथ घेतली होती की “काश्मीरला मुक्त करण्यासाठी तो दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये जिहाद करण्यासाठी पाठवणार. असाच जिहाद इस्रायलच्या विरोधातही पुकारणार!” बाबरी मशीद आझाद करून रामजन्मभूमीवर हल्ला करण्याचा इशाराही त्याने दिला होता. हे सगळे पाकिस्तानमध्ये बसून तो करत होता. मात्र, पाकिस्तानचे म्हणणे की, अजहर अफगाणिस्तानमध्ये आहे. यावर अफगाणिस्ताननेही म्हटले होते की, “दहशतवाद्यांना डोक्यावर फक्त पाकिस्तानच घेऊ शकते; आम्ही नाही!” तालिबान्यांनाही दहशतवादी वाटणारा देश पाकिस्तानच!
एका अहवालानुसार, गेल्या महिन्यात म्हणजे दि. ५ फेब्रुवारी रेाजी ‘जैश-ए- मोहम्मद’ने रावळकोट येथे ‘काश्मीर एकजुटता आणि हमास ऑपरेशन’ असे संमेलन आयोजित केले होते. यामध्ये काश्मीरची स्थिती आणि गाझाची स्थिती समान आहे. गाझा आणि काश्मीर स्वतंत्र होणे गरजेचे आहे, या विषयावर या दहशतवादी संघटनेने चर्चा केली. ‘जैश’ने ‘लष्कर-ए-तोयबा’सह ‘हमास’च्या दहशतवाद्यांनाही या संमेलनामध्ये आमंत्रित केले होते. अर्थात, हे सगळे पाकिस्तानच्या देखरेखीखालीच होत होते. असो. भारत, ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये या संघटनेला बंदी आहे. पाकिस्तानमध्येही बंदी आहे. पण, पाकिस्तानची बंदी हे नाटक होते, हे आता नुकतेच उपग्रहाच्या माध्यमातून प्राप्त छायाचित्रांवरुन दिसून आले. या छायाचित्रांमध्ये ‘जैश-ए-मोहम्मद’च्या दहशतवादी केंद्रांचीही छायाचित्रे आहेत. बहावलपूर येथे १८ एकर परिसरात ‘जैश-ए-मोहम्मद’चे कार्यालय आहे. भव्य मशिदीसह अनेक इमारतीही आहेत. पण, २०१२ साली ‘जैश’चे हेच केंद्र केवळ नऊ एकर जमिनीवर होते.
पाकिस्तानमध्ये या दहशतवादी संघटनेवर बंदी असतानाही, या दहशतवादी केंद्राचा विस्तार कसा झाला? महत्त्वाचे म्हणजे, ‘जैश’चे हे दहशतवादी केंद्र पाकिस्तानी सैन्याच्या बहावलपूर कॅन्टोन्मेंटपासून सहा किमी आणि एअर फोर्स स्टेशनपासून केवळ दहा किमी दूर आहे. याचाच अर्थ पाकिस्तानने कितीही जाहीर केले की, त्याने दहशतवादी संघटनांवर बंदी घातली आहे, तरीसुद्धा सत्य हेच आहे की, पाकिस्तानच्या छत्रछायेमध्येच जगभरातल्या क्रूर दहशतवादी संघटनांनी जोर धरला आहे. पाकिस्तान त्याच्या या दहशतवादी भूमिकेला जगापासून लपवू पाहात होता. मात्र, ‘इन्स्टिट्यूट फॉर इकोनॉमिक्स अॅण्ड पीस’ या संस्थेने ‘ग्लोबल टेरेरिझम इंडेक्स २०२५’ अहवालाने पाकिस्तानचे खरे स्वरूप उघड झाले, आतंकीस्तान!