पतसंस्थांवर अजूनही सर्वसामान्यांचा विश्वास : अ‍ॅड. सुजीत जगताप

07 Mar 2025 12:07:46
 
adv. sujit jagtap interview
 
 
 
लालबाग-परळ हा भाग म्हणजे मुंबईचे जणू चैतन्यच! पूर्वी अहोरात्र राबणार्‍या गिरणी कामगारांमुळे आणि गिरण्यांच्या भोंग्यांमुळे कायमच जागा असलेला हा भाग. आज गिरण्यांची जागा आलिशान मॉल्सने, टोलेजंग इमारतींनी घेतली असली तरी, या गिरण्यांचे गतवैभव असलेल्या गिरणी कामगारांना संघटित करून त्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍या अनेक संस्थादेखील लालबाग-परळच्याच मातीत उभ्या राहिल्या. अशाच एक लालबाग-परळमधील कामगारांना बचतीची सवय लावून, गेल्या ४१ वर्षांपासून त्यांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग सुकर करणार्‍या ‘माने मास्तर’ या पतसंस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. सुजीत जगताप यांच्याशी केलेली ही खास बातचीत...
 
  • गेल्या चार दशकांहून अधिक काळ आपल्या पतसंस्थेची यशस्वी वाटचाल सुरु आहे. तेव्हा, या पतसंस्थेच्या स्थापनेमागच्या उद्देशाविषयी काय सांगाल?
 
१९८२ साली ऐन गिरणी संपाच्या काळात अ‍ॅड. संपतराव जगताप आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मिळून ‘माने मास्तर’ या पतसंस्थेची स्थापना केली. गिरणगावातच असल्याने प्रामुख्याने गिरणी कामगार आणि त्यांचे कुटुंबीय यांना आर्थिक साहाय्य व्हावे, यासाठी या पतसंस्थेची सुरुवात केली. प्रारंभी फक्त याच विभागातील कर्मचार्‍यांची सोय व्हावी, हाच उद्देश होता. नंतर कामगारांच्या विश्वासावरच या पतसंस्थेने एवढा मोठा पल्ला गाठला.
 
  • कुठलीही वित्त संस्था चालवणे, त्यातून पतसंस्थेसारखी संस्था असेल तर हे खरं तर अत्यंत जिकिरीचे काम. तेव्हा, या पतसंस्थेचे व्यवस्थापन कसे केले जाते आणि आपण ग्राहकांना कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करुन देता?
 
पतसंस्था ही अजूनही सर्वसामान्यांच्या जवळच्या असणार्‍या संस्थांपैकी एक आहे. त्यामुळे कायम आपल्या भागातील जिथे जाणे-येणे हे आपल्या आवाक्यात आहे, अशा पतसंस्थांना आपल्या आर्थिक निकडीच्या काळात अजूनही ग्राहकांची पसंती मिळते. त्यामुळे या पतसंस्था टिकून आहेत. मुळात पतसंस्थांमध्ये महत्त्वाचा भाग असतो, तो कर्ज मिळणे. तरीही आजच्या काळात वारेमाप कर्ज देणारी अ‍ॅप्स, इतर वित्तीय संस्था यांमुळे सामान्यांना कर्ज मिळणे सोपे झाले आहे. तरीही, हे कर्ज घेतल्यावर त्याच्या व्याजापायी होणारी फसवणूक यांमुळे ग्राहकांची फरफट होते. त्यामुळे जिथे आपल्या विश्वासाची माणसे आहेत, जिकडे आपले पैसे सुरक्षित राहतील, ज्यांच्या कार्यपद्धतीबद्दल शंका घेण्यास काही जागा नाही, अशा पतसंस्थांकडे मग लोक आपसूकच वळतात. त्यामुळे आपल्याकडे येणार्‍या ग्राहकाला आपण योग्य आणि परवडेल अशा दरात कर्जाची सेवा आणि इतर सेवा उपलब्ध करून देतो.
 
  • संस्था म्हटले की, आव्हाने ही ओघाने आलीच, तर आपल्या पतसंस्थेच्या कारकिर्दीतील आव्हानात्मक काळ कुठला होता आणि आपण त्याला कसे सामोरे गेलात?
 
आमच्या संस्थेच्या कारकिर्दीतील सर्वांत मोठा आव्हानात्मक काळ म्हणजे गिरणी कामगारांच्या संपाचा काळ. हा संप अपेक्षेपेक्षा अधिक लांबल्यामुळे अखेरीस त्याचे पर्यवसन हे गिरण्या बंद पडण्यात आणि कामगारांच्या नोकर्‍या जाण्यात झाले. या काळात दिल्या गेलेल्या कर्जाची वसुली करणे फारच कठीण काम होते. त्यामुळे या काळात या कामगारांचे समुपदेशन करून, त्यांना वेळप्रसंगी सूट देऊन, म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांनुसार ज्या कुठल्या सवलती देता येतील, त्या देऊन कामगारांना मदत करत ही वसुली पूर्ण करण्यात आली. म्हणजे, या कठीण प्रसंगात कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहात, त्यांना आणि पतसंस्थेला दोघांनाही संकटमुक्त करण्याचे काम त्यावेळी संस्थेच्या चालकांनी केले.
 
  • खासगी वित्तीय संस्था म्हटले की, कायमच एक नकारात्मक प्रतिमा जनमानसात निर्माण होते. याबाबत आपले आकलन काय?
 
मुळात वित्तीय संस्था म्हटल्या की, त्यांच्याबद्दल सध्या वेळोवेळी घडणार्‍या गोष्टींमुळे लोकांच्या मनात संशय निर्माण होतो. संस्थेतील गैरप्रकार, वारेमाप दिली जाणारी कर्जे यांमुळे संस्था बंद होतात. याला संपूर्णपणे त्या त्या वित्तीय संस्थेतील कार्यकारी मंडळच जबाबदार असते. लोकांचीसुद्धा या बाबतीत थोडी चूक आहे. कोणीही उठून कुठलीही अवास्तव आमिषे दाखवून लोकांकडून पैसे घेतो आणि इतक्या जागृतीनंतरही लोक त्यात पैसे गुंतवतात आणि फसतात. त्यामुळे या नकारात्मकतेला पतसंस्था आणि त्यांचे चालक जसे जबाबदार असतात, तसेच नागरिकांनीही जागरुकता दाखवून आपल्या पैशांची काळजी घेतली पाहिजे.
 
  • वित्तीय संस्था म्हटल्या की, कर्ज आणि त्यांची वसुली हाही एक कळीचा मुद्दा. या मुद्द्यावर आपली संस्था कसे काम करते?
 
खरोखरच हा कळीचा मुद्दा आहे. कारण, कुठल्याही पतसंस्था या कर्ज आणि त्यांचे व्याजदर यांच्यावरच चालतात. त्यामुळे कर्ज देताना आपल्या संस्थेत कर्ज देतेवेळेस त्या अर्जदाराची पात्रता, त्याची खरोखरची निकड, त्याच्याकडून दिली जाणारी कागदपत्रे, तारण, या सर्वांचा विचार करूनच कर्ज दिली जातात. त्यामुळे कर्ज योग्य व्यक्तीला आणि योग्य त्या व्यक्तीपर्यंत पोहोचते, हेच आमचे वैशिष्ट्य आहे.
 
  • ४१ वर्षांचा प्रदीर्घ प्रवास आपल्या पतसंस्थेने पूर्ण केला आहे. आता पुढील प्रवासाच्या आराखड्यांबद्दल काय सांगाल?
 
प्रारंभी फक्त गिरणी कामगार आणि त्यांना मदत व्हावी, याच उद्देशाने ही पतसंस्था सुरू झाली. आता याचा विस्तार करायचा आहे. छोटे दुकानदार, छोट्या उद्योगांमध्ये काम करणारे या सर्वांनाही सभासद करून घेत सभासदांची संख्या वाढवणे, सोने तारण, तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे, हे आमचे या पुढील काळातील उद्दिष्ट आहे.
 
 
 
 
हर्षद वैद्य 
Powered By Sangraha 9.0